You are currently viewing मालवणात नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त निबंध, रंगभरण, वेशभूषा स्पर्धेचे आयोजन…

मालवणात नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त निबंध, रंगभरण, वेशभूषा स्पर्धेचे आयोजन…

मालवणात नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त निबंध, रंगभरण, वेशभूषा स्पर्धेचे आयोजन…

मालवण

गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने यावर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, रंगभरण तसेच छोट्या गटासह, खुल्या गटासाठी पौराणिक, ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या नियोजन बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती हिंदू नववर्ष स्वागत यात्रा प्रमुख प्रशांत हिंदळेकर यांनी दिली.

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा नियोजन समितीची बैठक भरड येथील दत्त मंदिर येथे झाली. बैठकीस विद्याधर केनवडेकर, अमित खोत, अनिकेत फाटक, भाऊ सामंत, रत्नाकर कोळंबकर, श्रीराज बादेकर, अरविंद मयेकर, गणेश मेस्त्री, हरेश फडते, भूषण साटम, राजेंद्र बिडये यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने यावर्षीही गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन बैठकीत करण्यात आले. त्याचबरोबर निबंध, रंगभरण, वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आपल्या हिंदू संस्कृतीचे संवर्धन व्हावे तसेच एक वैचारिक सांस्कृतिक मंथन व्हावे या दृष्टिकोनातून समितीच्या वतीने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी हिंदू संस्कृती व सणांचे दैनंदिन आयुष्यातील महत्त्व हा विषय ठेवण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००, १००० रुपये तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. निबंध स्पर्धकाने स्वतःच्या मेहनतीने लिहावा हा या स्पर्धेचा उद्देश आहे. चॅट जीपीटी सारख्या तंत्रज्ञानाची मदत स्पर्धकाने घेऊ नये. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. स्पर्धेचा निकाल नववर्ष स्वागत यात्रेच्या वेळी जाहीर केला जाणार आहे. आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना आपल्या संस्कृती संवर्धनासाठी शिक्षक व पालकांनी प्रोत्साहित करून ही विविधांगी निबंध स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

इयत्ता पहिली ते चौथी तसेच पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यातील पहिल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ११००, ७००, ५०० रुपये, सहभाग प्रमाणपत्र, दुसऱ्या गटातील विजेत्यांना २०००, १५००, १००० रुपये, सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. लहान गटासह खुल्या गटासाठी ही वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात पौराणिक, ऐतिहासिक पात्रे असावीत असा स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे बंटी केनवडेकर- ९४२२५९६६८२, अमित खोत- ९४०४४५७७८८ यांच्याशी संपर्क साधावा. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा