You are currently viewing नसीब अपना अपना…

नसीब अपना अपना…

*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम लघुकथा*

 

*नसीब अपना अपना…*

 

आजही “नसीब अपना अपना” हा सिनेमा दूरदर्शनवर लागला

की आम्ही नव्याने पुन्हा पुन्हा बघतो. त्याची आठवणच तशी भारी गंमतशीर आहे.

आमचे नवीन नवीन लग्न झाले होते. आमचा छोटासा संसार. संसार चालविण्यापुरताच तुटपुंजा पगार. महिना अखेर तर ‘ठण ठण गोपाळ.’

तरी खाऊन पिऊन एखादा सिनेमा हमखास बघत होतो. महिना अखेर आणि ‘नसीब अपना अपना’ पाहायचे ठरले. हे म्हणाले – ” अगं ऐकलीस का?” (माझा नवरा कधीच नाव घेऊन हाक मारीत नाही आजही लग्नाला अडतीस वर्षे झाली तरी. हे विशेष. )

“काय हो!”

“आपण सिनेमाला जाऊया.”

मी एकदम खुश. तेव्हा करमणुकीचे दुसरे काही साधन नव्हते ना.

हे लगेच म्हणाले – “पण हे बघ जाताना रिक्शाने जाण्याचे आणि सिनेमाचे तिकीटं काढण्यापुरतेच पैसे आहेत माझ्याजवळ. येतांना पायी यावे लागेल.”

मी पटकन हो म्हणाले. नंतर आम्ही शान के साथ रिक्षा केली अन् टॉकीजला पोहोचलो. माझा आनंद गगनात मावत नव्हता. माणसांच्या तुलनेत बायकांच्या रांगेत गर्दी खूप कमी होती. त्यामुळे तिकीटं काढण्याचे काम माझ्याकडे आले. रांगेत उभी राहून माझा नंबर येण्याची वाट पाहू लागले. आला एकदाचा नंबर. छोट्याशा खिडकीतून हात घालून म्हणाले – “दोन फर्स्ट क्लास”

त्याने दोन तिकीटं फाडून माझ्या हातात दिली. मी हाशहुश करीत ह्यांच्या जवळ आली. तिकीटं हातात दिली आणि आमचे नशीब चमकले. दोनच्या ऐवजी तीन तिकीटं चुकून

दिल्या गेली होती. एकदा वाटले जाऊन वापस करावे. पण तिसरी घंटा ऐकू आली आणि एकजण ओळखीचे तिथे आले म्हणाले – “मॅडम, प्लीज एक तिकीट काढून देता का?” तसेही बायकांच्या रांगेत कुणीच नाही”. लगेच तिकीटाचे पैसेही माझ्या हातात दिले. तेव्हा अशी एकमेकाला तिकीटं काढून मागायची पद्धत होती. एक माणुसकी म्हणून तिकीटं काढून दिली जायची. मी पटकन म्हणाले – “माझ्याकडे आहे एक आगाऊचे तिकीट.”लगेच ते तिकीट त्यांच्या हातात ठेवले. पैसे तर त्यांनी दिलेच होते.मग आम्ही दोघांनीही मजेत सिनेमा पाहिला मध्यंतरात उसाचा गारेगार रस पिला आणि सिनेमा संपल्यावर परत शान के साथ रिक्षाने घरी आलो. घरी आल्यावर ह्यांना म्हणाले – ” यालाच म्हणतात “नसीब अपना अपना” आणि आम्ही दोघे खूप खळखळून हसलो. आजही हे सारे आठवले की हसायला येते. तेव्हा सिनेमा पाहण्याची मजाच काही औरच होती.

@अरुणा गर्जे

प्रतिक्रिया व्यक्त करा