You are currently viewing आरोग्यसेवेतील समर्पणाला राष्ट्रीय सन्मान – डॉ. राणी व अभय बंग यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार

आरोग्यसेवेतील समर्पणाला राष्ट्रीय सन्मान – डॉ. राणी व अभय बंग यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार

*आरोग्यसेवेतील समर्पणाला राष्ट्रीय सन्मान – डॉ. राणी व अभय बंग यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आदिवासी भागातील आरोग्यसेवा आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात अपूर्व कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र असे असून, बुधवार, १२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, चव्हाण सेंटर, मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सेंटरचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या हस्ते या दोन्ही सामाजिक योद्ध्यांचा गौरव केला जाईल.

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या पुरस्काराच्या निमित्ताने ग्रामीण व आदिवासी आरोग्यसेवेसाठी समर्पित जीवन व्यतीत करणाऱ्या डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे.

डॉ. बंग दाम्पत्याने ‘सर्च’ या संस्थेच्या माध्यमातून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्यसेवेचा यशस्वी विस्तार केला. विशेषतः आदिवासी महिलांचे आरोग्य, नवजात बालकांची काळजी आणि समुपदेशन क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेकांचे जीवन उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत त्यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा