अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईत ड्रग्ज विकून दहशतवादाला आर्थिक पुरवठा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकांनी (एनसीबी) अटक केलेल्या गँगस्टर चिंकू पठाण याच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. गेल्या ५ वर्षांत तब्बल १५००कोटींचे ड्रग्ज विकले गेले आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अंमली पदार्थ तस्करी करणा-यांचे कंबरडे मोडले आहे. याच कारवाई दरम्यान, अंमलीपदार्थ विरोधी पथकाने गँगस्टर चिंकू पठाणला अटक केली होती. त्याच्याकडे सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
५ वर्षांत १५०० कोटींची ड्रग्जविक्री
दाऊदचे हस्तक मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज विकून ते पैसे दाऊदला पाठवत होते. हवाला मार्गे हा पैसा पाठवला जात होता. गेल्या पाच वर्षांमध्ये या तस्करांनी १५०० कोटींचे ड्रग्ज विकले होते. हा पैसा दाऊदकडे पोहोचल्यानंतर तो दहशतवाद्यांना कारवाया करण्यासाठी पुरवत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, एनसीबी सातत्याने मुंबईत अंमली पदार्थ विक्री करणारे एजंट व दर्गुल्ल्यांवर कारवाई करीत आहे. पथकाचे अधिकारी समीर वानखेडेंनी आजही मोठी कारवाई केली आहे. डोंगरीसारख्या परिसरात घुसून वानखेडे यांनी ४ ठिकाणी धाड टाकली आहे. दाऊदच्या ड्रग्ज अड्ड्यांवर सुद्धा कारवाई केली आहे. दाऊदच्या आणखी एका हस्तकाला अटक करण्यात आल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला आहे.
पठाणच्या डायरीत अनेक मोठी नावे
काही दिवसांत मुंबईतून दाऊदची ड्रग्सची दहशत संपवणार आहे. ड्रग्स तस्करी करुन दाऊदच्या हस्तकांनी कमावलेली संपत्ती जप्त करण्यात येणार आहे, अशी अन्य एका अधिका-याने दिली. तसेच चिंकू पठाणकडे सापडलेल्या डायरीत अनेक तस्करांची व गर्दुल्ल्यांची नावे समोर आली आहे. यामध्ये काही उद्योगपती आणि सेलिब्रिटींचाही समावेश असून एनसीबी लवकरच त्यांची चौकशी करणार असल्याचेही एनसीबीकडून सांगण्यात येत आहे