*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*म्हणे मुक्त झाली नारी..?*
टाहो फोडतात म्हणतात, मुक्त झाली नारी
कोण टोचतं घरीदारी, दिसत नाही “आरी”
बैलासारखे टोचत असतात, रक्तबंबाळ करतात
आतल्याआत घुसमटत किती बायका रडतात…
झाकली मूठ ठेवते नारी, म्हणून बरे आहे
जायला तिला जागाच नाही, हे ही खरे आहे
सांगाना, जाईल कुठे? जागाच नाही तिला
बेलदाराचा “ हेला” ती, पाणी वाहून मेला…
बंद ओठात दडल्यात हो हजारो करूण कहाण्या
अगदी थोड्याच असतात नारी, असतात त्या “राण्या”
बाकी मग जुंपलेल्याच दिवसभर “ऱ्हाडा”
ओठ शिवून ओढत असतात संसाराचा गाडा..
स्वतंत्रता? छे! अदृश्य असतात नाड्या
कठपुतळ्या नाचत असतात, आनंदाने”वेड्या”
उच्चपदावरती असतात, त्यांचे थोडे धकते
बाकी मग आनंदच, मरत मरत जगते…
गोंडस नावाखाली एक नारी सन्मान दिवस?
किती दुष्ट आहे माणूस आणि त्याची”हवस”
पोळ्यासारखी एक दिवस फक्त तिला पुजावी
वाट्टेल तशी मनमानी करून युगे युगे वापरावी…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)