अंगणवाडी सेविकेचा खून, सावंतवाडीत रविवारी श्रध्दांजली सभा
सावंतवाडी
किनळे येथील अंगणवाडी सेविका कै.कुन्दना कावळे उर्फ सुचिता सोपटेच्या खुन्याला आणि त्याच्या साथीदारांना फाशी द्या अशी मागणी अंगणवाडी सेविका नेत्या कमलताई परूळेकर यांनी केली आहे. दरम्यान येत्या रविवार दि.९ मार्च रोजी सावंतवाडीत श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी तालुक्यातील किनळेची
सेविका कुन्दना उर्फ सुचिता सोपटेचा २४ फेब्रुवारीला पैशाच्या लोभाने निर्घृण खून झाला.विश्वासातल्या ड्रायव्हरने तिचा पैशाच्या हव्यासापोटी खून केला असे सध्या तरी निष्पन्न झाले आहे.आरोपी वितोरीन रूजाय फर्नाडिस सध्या गजाआड आहे.पण प्रकरण एवढ्यावरच संपलेले नाही असा अनेक सेविका मदतनीसना संशय आहे.तगडी,हुषार,परोपकारी आणि व्यवहार जाणणारी कुन्दना फसून मरेल असे वाटंतंच नाही. आणखी काही आर्थिक व्यवहारातली माणसे या खुनामागे असावीत,ती पोलीसांनी शोधायची आहेत असे आम्हाला वाटते,असे त्यांनी म्हटले आहे.
रविवार दि. ९ मार्च रोजी ठीक ११ वाजता सावंतवाडीतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यानी सावंतवाडीत कुन्दनाला श्रध्दांजली वाहण्यासाठी श्रीराम वाचनालय येथे सभेसाठी वेळेवर यावे. यावेळी जिल्हा अधीक्षक कार्यालयावर काढावयाच्या मोर्चाची तारीखही ठरवता येईल.त्यावेळी जिल्हाभरातून भगिनी येतीलच.रविवारी फक्त सावंतवाडी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी यानी सभेला यावे असे आवाहन कमलताई परुळेकर यानी केले आहे.