*आधुनिक शेतीला माती व पाणी परीक्षणाची गरज*-
श्री.चेतन प्रभू
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये एक दिवसीय माती व पाणी परीक्षण शाश्वत वाढीची गुरुकिल्ली या विषयावरती कार्यशाळा बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून स्वामी लॅब सोल्युशन कणकवलीचे श्री.चेतन प्रभू हे लाभले. सदर कार्यशाळा ही प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान अंतर्गत महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी. विभाग शिक्षकेतर कर्मचारी सोसायटी व रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आली होती. सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच वैभववाडी तालुक्यातील शेतकरी वर्ग सहभागी होता. या कार्यशाळेमध्ये श्री.चेतन प्रभू यांनी माती व पाणी परीक्षण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. मातीचा पोत आणि विविध सेंद्रिय घटक ज्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस, पोटॅशियम तसेच इतर खनिज द्रव्य यांचा योग्य तो वापर केल्यास शेतीमाल, फळबागांचे उत्पन्न कशा पद्धतीने वाढवता येईल याचे व्यवस्थापन करण्याचा मूलमंत्र दिला. कोकणातील पावसाचा विचार करता जूनमध्ये दिलेले खत झाडांच्या वाढीकरिता न मिळता वाहून जाते. झाडांसाठी लागणारे मुख्य घटक न मिळाल्याने झाडाची वाढ व मिळणारे फळ हे आपल्याला उत्तमरीत्या मिळत नाही. याकरिता उत्तम प्रकारचे खत म्हणून सेंद्रिय खत ज्यामध्ये राखेचा विशेष वापर केला पाहिजे.
राखेमध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असल्याने गरजेनुसार सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये मातीचे परीक्षण करून योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करून चांगल्या पद्धतीचे पीक मिळवता येईल. कोकणामध्ये पिकणाऱ्या नारळ,सुपारी, आंबा, काजू व फणस फळबागा तसेच भातशेती व कुळीथाची आधुनिक पद्धतीने शेती करणे तसेच वातावरणातील होणारा बदल जाणून घेऊन त्यानुसार झाडांची निगा राखणे याकरिता एआय टेक्नॉलॉजीचा व विविध शेतकरी ॲप उपलब्ध आहेत त्यांचा योग्य वापर करून आपल्या शेतीमालाची व्यवस्थित काळजी घेता येईल व त्यानुसार शेती कामातील बदल करता येतील असे सांगितले. शेती व्यवसाय ज्या विद्यार्थ्यांना अथवा शेतकरी वर्गाला करायचा असेल त्यांनी पूर्ण वेळ शेतामध्ये आपला वेळ देऊन शेतीमधून शंभर टक्के उत्पन्न चांगल्या पद्धतीने घेण्याकरिता प्रयत्न करावेत असे आवाहन श्री.चेतन प्रभू यांनी केले.
कोकणातील पारंपरिक शेती पद्धतीला आधुनिकतेची जोड देऊन शेतीचा अवलंब करावा. कोकणामध्ये शेती व्यवसायाकडे नवीन पिढीने पावले उचलावीत असे आवाहन कार्यशाळेचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.एन.व्ही.
गवळी यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. एम. सीरसट यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अधीक्षक श्री.संजय रावराणे, शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष श्री. मुकुंद रावराणे, सेक्रेटरी प्रा.एस. एम. करपे, डॉ. के. एस. पाखरे व डॉ. वी. बी. गोपुला उपस्थित होते.