You are currently viewing खऱ्या अर्थाने आहेत तेजस्वी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते 

खऱ्या अर्थाने आहेत तेजस्वी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते 

8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही प्रशासनातील सनदी व राजपत्रित महिलाअधिकाऱ्यांची तोंड ओळख आमच्या रसिकांना आमच्या वाचकांना करून देत आहोत. आज आयपीएस अधिकारी श्रीमती तेजस्वी सातपुते यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवण्याचा या लेखांमध्ये प्रयत्न केला आहे..

 

खऱ्या अर्थाने आहेत तेजस्वी 

आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते 

 

एका विद्यार्थिनीला तिचे शिकवणी घेणारे अध्यापक तिला नाकारतात. कारण काय तर ती शिकवणी वर्गांना अनियमित येते. कारण तिचे पूर्ण लक्ष होते ते ती करीत असलेल्या नाट्यकृतीमध्ये. नाटक म्हटले म्हणजे तालीम आली. तालमीत वेळ जायचा आणि शिकवणी वर्गात जायला उशीर व्हायचा. किंवा कधी कधी जाण्यास जमायचे नाही. त्या अध्यापकांना या गोष्टीचा राग आला. आणि त्यांनी शिकवणी वर्गातून तिला बडतर्फ केले. तिची बाजू घेऊन तिचे वडील शिकवणी वर्गात गेले. पण अनेक वेळा विनंती करूनही त्या अध्यापकाला दया आली नाही. नाही म्हणजे नाही हे समीकरण काही बदलले नाही.

तेजस्वीला या प्रसंगातून खूप काही शिकायला मिळाले. तेव्हा ती सातव्या वर्गात शिकत होती. तिची चूक तिला मान्य होती. पण नाटकात काम करणे तेवढेच तिला आवश्यक वाटत होते. तिला अभ्यासाबद्दल खात्री होती. पण शिक्षकांना तिचा अनियमितपणा आवडत नव्हता. सातव्या वर्गात असताना तेजस्विने स्कॉलरशिपच्या परीक्षेचा इतका अभ्यास केला इतका अभ्यास केला की तिला नकार देणाऱ्या शिक्षकाच्या शिकवणी वर्गातील सर्व मुलांपेक्षा तिला जास्त मार्क मिळाले. सर्वजण पाहतच राहिले. आपले नाटक करून ती अभ्यासाच्या नाटकात देखील यशस्वी झाली होती. कारण ती तेजस्वी होती.

तेव्हाचे अहमदनगर हा जिल्हा अहिल्यानगर नावाने ओळखले जातो. या अहिल्यानगर व औरंगाबाद जिल्ह्याच्या बॉर्डरवर एक गाव आहे शेवगाव हे त्या गावाचे नाव. या गावाला अजून एक संदर्भ आहे. या गावाजवळ असलेल्या सालवडगावचे डॉ.पुरुषोत्तम भापकर नावाचे सनदी अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कार्यकुशलतेमुळे प्रसिद्ध झालेले आहेत. तेजस्वीचे पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण शेवगावला झाले. पुढे बीएससी करण्यासाठी तिने पुणे जिल्ह्यातील बारामती येथील सुप्रसिद्ध विद्या प्रतिष्ठान मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये एलएलबी करण्यासाठी ती दाखल झाली.

खरं तर तेजस्वीला पायलट व्हायचे होते. पण त्यासाठी तिचा चष्मा आडवा आला. पायलट होण्यासाठी चष्मा चालत नाही असे कोणीतरी तिला सांगितले. म्हणून तिने पायलट होण्याचे आपल्या स्वप्न बाजूला ठेवले. एल एल बी ला असताना तिला स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली. आयएएस परीक्षेची माहिती मिळाली. शालेय जीवनामध्ये ती स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसली होती आणि चांगली गुणवत्तेने उत्तीर्ण झाली होती. ती पार्श्वभूमी तिच्या पाठीशी होती आणि म्हणून तिने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. आई कृष्णाबाई प्राथमिक शिक्षिका होती. वडील व्यवसायात होते. तेजस्वीला खरी आवड होती ती खेळ क्रीडा नाटक भाषण आणि चित्रकला ह्या तिच्या कला ती आपापल्या परीने वाढीस नेत होती.

इतर मुलांना वाटत होते त्याप्रमाणे तिला डॉक्टर इंजिनियर होणे काही आवडले नाही. या तिच्या कामात तिच्या वडिलांनी तिला साथ दिली. ते म्हणाले बेटा तुला जे पटते जे आवडते ते कर. तू डॉक्टर इंजिनियर झाली पाहिजे हे काही गरजेचे नाही. आई कृष्णाबाई जरी प्राथमिक शिक्षिका होत्या तरी त्यांनी पुढे एम ए आणि पीएचडी पर्यंत आपले शिक्षण वाढवले. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला पुढे नेइ. अशा प्रकारे आईची शान असल्यामुळे बाबांची साथ असल्यामुळे तिने आयएएसच्या तयारीला प्रारंभ केला.

सुरुवातीला चाणक्य फाउंडेशनचा प्रारंभिक कोर्स तिने पूर्ण केला आणि मग तिला लक्षात आले की आपण ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतो आणि ती तन मनधनाने परीक्षेला लागली. तिने वैकल्पिक विषय म्हणून समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र हे दोन विषय निवडले होते. त्यावेळेस मुख्य परीक्षेला दोन विषय निवडावे लागत होते आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने फक्त एकच वैकल्पिक विषय ठेवलेला आहे.

तेजस्विने केलेल्या् प्रयत्नमुळे ती आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिला आयएएस नाही मिळाले. परंतु आयपीएस मिळाले. आपले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती मराठवाड्यातील परतूर येथे रुजू झाली. तिचे ते पहिले पोस्टिंग. तिने कामाचा सपाटा सुरू केला. निर्भय अभियान सारखे कार्यक्रम सातत्याने ती राबवित राहिली. पुढे पुणे ग्रामीणला तिची बदली झाली आणि त्यानंतर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून तेजस्वी सातपुते यांची निवड करण्यात आली. साताऱ्याचा काळ संपल्यानंतर त्यांना सोलापूरला पाठविण्यात आले. या सर्व प्रवासात तेजस्वी चांगलं काम करीत राहिली. त्या चांगल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने तिचा सन्मान पण घडवून आणला.

स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांना ती एकच सांगते की तुमचां विल पावर पक्का ठेवा आणि तो पक्का असला तर मग तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही. तेजस्विने केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण करून ग्रामीण मुलींसमोर एक आदर्श ठेवला आहे. शेवगाव सारखे ग्रामीण भागातील गाव. हे गाव देखील हायवे किंवा समृद्धी मार्गावर नाही. त्यामुळे गावात शिक्षणाच्या अध्ययावत सोयी पाहिजे होत्या त्या देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या नाहीत. पण आहे त्या परिस्थितीशी तिने तडजोड करून आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातच शेवगाव आणि बारामती येथे आपल्या व्यक्तिमत्त्वाची मांडणी केली. ती बीएससी होईपर्यंत तिला या परीक्षेबद्दल फारसे काही माहिती नव्हते. पुण्याला लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आणि तिचे भाग्य उदयाला आले. इथेच तिला आयएएस या परीक्षेची माहिती मिळाली. आजच्या काळात तर अगदी शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षांची माहिती मुलांना प्राप्त होऊन जाते. पण तेजस्वी जेव्हा अभ्यास करीत होती तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. पण उशिरा का होईना तिला जी संधी मिळाली. त्या संधीचे तिने सोने केले आणि आय पी एस अधिकाऱ्याची जागा खेचून आणली. सुरुवातीपासून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत गेल्यामुळे तिचा जो बेसिक पाया होता तो फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्का झाला होता.त्यामुळे तिला आयएएस ही परीक्षा जड गेली नाही. ग्रामीण भागात राहूनही यश प्राप्त करता येते. हा पायंडा तिने ग्रामीण भागातील मुलांसमोर ठेवला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयपीएस अधिकारी असलेल्या श्रीमती तेजस्वी सातपुते यांना हार्दिक शुभेच्छा…!

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

जिजाऊ नगर

महापौरांच्या बंगल्यासमोर

विद्यापीठ रोड अमरावती कॅम्प 444602

महाराष्ट्र

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा