You are currently viewing सोनसळी बहावा..

सोनसळी बहावा..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सोनसळी बहावा….*

 

एका रात्री पाहिला बहावा ,

चंद्र प्रकाशी बहरताना !

गुंतून गेले हळवे मन माझे,

पिवळे झुंबर न्याहाळताना!….१

 

निळ्याशार नभ छत्राखाली,

लोलक पिवळे सोनसावळे!

हिरव्या पानी गुंतुन लोलक,

सौंदर्य अधिकच खुलून आले!..२

 

शांत नीरव रात भासली,

जणू स्वप्नवत् स्वर्ग नगरी!

कधी न संपावे ते अपूर्व क्षण,

आस लागली मनास खरी !..३

 

फुलल्या बहाव्याच्या मिठीत,

सामावून अलगद जावे !

मृदू कोमल स्पर्शाने त्याच्या,

अंगोपांगी बहरून यावे!..४

 

 

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा