You are currently viewing शिराळे झाले सुनेसुने : गावच्या गावपळणला सुरुवात

शिराळे झाले सुनेसुने : गावच्या गावपळणला सुरुवात

पाळीव प्राण्यांसह ग्रामस्थ झाले स्थलांतरित.

वैभववाडी
तालुक्यातील शिराळे गावच्या गावपळणला गेली शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे. शुक्रवारी या शिराळे गावच्या गावपळणची सुरुवात झाली आहे. गावातील ग्रामस्थ पशू-प्राणी व इतर लवाजम्यासह गावाच्या वेशीबाहेर स्थलांतरित झाले आहेत. दरवर्षी येथील ग्रामस्थ गावपळण हे वार्षिक म्हणून एकत्र येऊन पार पाडत आहेत. गावाच्या सीमेनजीक असलेल्या सडुरे गावात काही दिवस उभारलेल्या झोपड्यांमध्ये लोक वास्तव करणार आहेत. गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पोस्ट खात्याचे व्यवहार तसेच ग्रामपंचायत कारभार प्रशासनाच्या सहकार्याने गावाबाहेर चालणार आहे. प्राथमिक शाळा ही झाडाच्या सावलीखाली चालवली जाणार आहे.
शिराळे वासियांची गावपळण म्हणजे गावचे वार्षिक म्हणून पार पाडले जाते. गेली कित्येक वर्ष गावातील ग्रामस्थ धार्मिक सण म्हणून हे वार्षिक साजरे करत आहेत. गावच्या ग्रामदेवतेला कौल लावून त्यानंतर दिलेल्या आज्ञेनुसार गावातून पाळीव प्राण्यांसह लोक गावाच्या वेशी बाहेर येऊन रहाणार आहेत. तीन, पाच किंवा सात दिवसाची ही गावपळण असते. या दिवसाकरीता लागणा-या जीवनावश्यक वस्तूंची गाठोडी घेवूनन गावाबाहेर ग्रामस्थांचा संसार सुरू झाला आहे. गावच्या प्रथेनुसार या कालावधीमध्ये एकही माणूस व प्राणी गावात राहत नाही. गावचे ग्रामदैवत गावपळण कालावधीत गावातील घरे, अन्नधान्य, संपत्तीचे रक्षण करत असते. अशी श्रद्धा गावकरी मंडळी मानत आहेत.
गावपळणचे विशेष म्हणजे या दिवसात शिराळे गाव पूर्णपणे निर्मनुष्य होतो. मोकाट सोडलेली जनावरे यादरम्यान शिराळे गावच्या हद्दीत जात नाहीत. गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहत आहेत. तीन, पाच किंवा सात दिवसानंतर शिराळे ग्रामस्थ आपल्या ग्रामदेवतेला कौल लावून गावात प्रवेश करणार आहेत. गावपळण संपल्यानंतर सर्व ग्रामस्थ मिळून उत्सव साजरा करतात. त्यानंतर शेतीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =