You are currently viewing संतोष देशमुखांचे क्रूर हत्येचे फोटो-व्हिडिओ समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात बंदची हाक

संतोष देशमुखांचे क्रूर हत्येचे फोटो-व्हिडिओ समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात बंदची हाक

बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचे नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन..

बीड :

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीचे मनाला हादरवून टाकणारे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता जिल्ह्यातील नागरिक आक्रमक होताना दिसून येत आहेत. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी दि. ४ मार्च रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेत वाल्मिक कराडच्या गँगने संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारतानाचे फोटो, व्हिडीओ सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. हे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक होताना दिसून येत आहेत. प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. एरवी सकाळपासून आपली आस्थापने खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग पाहायला मिळते. मात्र या बंदच्या अनुषंगाने बाजारपेठा बंद ठेवल्या गेल्या आहेत.

देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी. अशी मागणी यादरम्यान केली जातेय. बीड जिल्ह्यात काल सोमवारी दि. ३ मार्च रात्रीपासूनच बीड बंदची हाक देणारी पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून येत असून आज मंगळवारी दि. ४ मार्च सकाळपासून बंदच्या अनुषंगाने बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांकडूनही बंदला पाठिंबा देण्यात आलाय. दुकानं बंद ठेवण्यात आली असून रस्त्यावर फारशी लोक दिसत नसून गाव सूना पडल्याचं चित्र आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. अद्याप कोणताही पक्ष अथवा संघटनेकडून अधिकृत भूमिका मांडलेली दिसून आलेली नाही. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचा परिणाम म्हणून आज बीड बंद होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

आज मराठा आंदोलन मनोज जरांगे हे देखील मस्साजोगमध्ये दाखल होणार असून ते देशमुख कुटुंबाला धीर देणार आहेत. दरम्यान, बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीडच्या नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात एक पत्रक जारी करण्यात आली असून पत्रकानुसार, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभाग यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात तपासाचा भाग असलेले काही फोटो आणि व्हिडीओ माध्यमांवर प्रसारित झाले असून समाजमाध्यमांवर प्रतिक्रीया उमटत आहेत. यासंदर्भात कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा