आरोग्य शिबिर, सत्कार सोहळ्याचे आयोजन
दोडामार्ग :
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या सेवाभावी संस्थेचा पहिला वर्धापनदिन रविवार, दि. 24 जानेवारी रोजी आडाळी (ता. दोडामार्ग) येथे जागतिक कीर्तीचे चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यानिमित्त अस्थिरोगतज्ञ डॉ. योगेश नवांगुळ (कुडाळ) यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य शिबिर, सत्कार सोहळा, कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत म्हणाले की, समाजसेवेच्या हेतुने स्थापन केलेल्या या शासन नोंदणीकृत संस्थेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त सर्वांना एकत्र आणण्याच्या हेतुने 24 जानेवारी रोजी वर्धापनदिनाचा सोहळा आडाळी (ता. दोडामार्ग) येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत आडाळी शाळेच्या सभागृहात अस्थिरोगतज्ञ डॉ. योगेश नवांगुळ (कुडाळ) यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता माऊली मंदिरासमोरील पटांगणावर मुख्य सोहळा जागतिक कीर्तीचे चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. संस्थेच्या अहवालाचे प्रकाशनही यावेळी होईल.
सायंकाळी 7.30 वाजता पिंगुळी (कुडाळ) येथील ‘ठाकर लोककला आंगण’चे श्री. परशुराम गंगावणे, चेतन गंगावणे यांच्या पारंपरिक मंडळाचा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार आहे. आडाळी पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व संस्थेच्या हितचिंतकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, उपाध्यक्षा डॉ. सई लळीत व विश्वस्त मंडळाने केले आहे.
🔹 सकाळी 10 ते दुपारी 1: अस्थिरोगतज्ञ डॉ. योगेश नवांगुळ (कुडाळ) यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर
🔹 सायं. 5.30: जागतिक कीर्तीचे चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या उपस्थितीत सत्कार व मुख्य सोहळा
🔹 सायं 7.30 वाजता पिंगुळी (कुडाळ) येथील श्री. परशुराम गंगावणे यांच्या मंडळाचा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ.