*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*‘मराठी भाषा दिन’*
ओंकराने आरंभ करुनी, गिरव प्रथम श्रीगणेशा,
बाराखडीची अक्षरे,शिकवते मराठी भाषा.
काना ,मात्रा,वेलांटी उकार
सांगड घाली कठोर व्यंजने मृदुस्वर
शब्दार्थ बदलती विरामचिन्हे,अनुस्वार चपखल अर्थाचे म्हणी, वाक्प्रचार
‘ळ’व ‘ण’अक्षरांविना भासे अधूरी आगळी मिराशी
इतर भाषेत नाही याची मौज कशी?
संभ्रमात टाकती एका शब्दाचे अनेक अन्वयार्थ,
गोष्टी,सांगती उदाहरणा सहित मतितार्थ.
ओवी,साकी,भारुड,करिती अंधश्रध्दा निर्मूलन,
जोगवा,गवळण,दिंडी,हरिपाठ संतांनी केले प्रबोधन
कथा, कविता, कांदबरींने विविध प्रकारे रंजन ,
तमाशा, चित्रपट ,नाटक म्हणजे मनोरंजन.
आपुला आरसा आपणास दाखवी दासबोध,
संतवाणी,मनाचे श्लोक,हे मनाचे आत्मबोध.
गीता,ज्ञानेश्वरी इहलोकीच्या संसाराचे मर्म,
जात पातीच्या पल्याड जाऊन कसे असावे कर्म?
वेद,उपनिषदे,महाभारत,रामायण ज्ञानाचे मुकुटमणी
देवनागरी,संस्कृत ह्यांना म्हणती गीर्वाणवाणी.
पाली ,मोडी,अर्ध मागधी मराठीच्या बहिणी,
गोडवे गाऊन परभाषेचे करू नका हो दीनवाणी.
‘वज्रादपि कठोर’तरी दावी सत्य शब्दसान्निध्य
‘आसेतु हिमाचल’ नांदते एकोप्याने भाषा वैविध्य
ज्ञान देण्या जगताला, आहे मराठी भाषा समृद्ध,
प्राचीन ऋषी मुनींप्रमाणे ज्ञानवृद्ध, तपोवृध्द.
पाठीवरचा हात आश्वासक,प्रेम दाखवी शब्द मुके,
तरूण पिढीचे मराठी ऐकूनी लज्जेने मान झुके.
समजून घ्या मातृभाषेचा गोडवा, आहे ती ज्ञानगंगा
संजीवनी देण्याला तुम्हा वाचूनी कोण आहे सांगा?
✒️प्रतिभा फणसळकर