*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल प्राविण्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित अप्रतिम लेख*
*अभिमानस्पद मराठी भाषा आमुची*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
‘माझी मराठीची बोलू कौतुकें।
परी अम्रुतातेही पैजा जिंके।
ऐसीं अक्षरे रसिकें मिळविन।’ – ज्ञाने.
अश्या प्राचीन अलौकिक मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून तीन ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय केंद्र सरकारने घोषित केले आणि तमाम मराठी भाषिकांंची छाती अभिमानाने फुलून आली.
मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषिकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी असून मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.
ह्या अभिजात भाषेची इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत तसेच गाथा सप्तशती हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. हे मुद्दे प्रा. हरी नरके यांनी मांडले आणि भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान ८० हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत.
महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहेच आणि भारतातील अनेक राज्यामध्ये ही मराठी भाषेचा प्रामुख्याने वावर होत आहे. देशातील ९ राज्ये, ४ संघराज्यशासित प्रदेश आणि ११३ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे, ही कौतुकाची बाब आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त ‘मराठी राजभाषा दिन’ अर्थात ‘मराठी भाषा दिन’ १ मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, तत्कालिन मुख्यमंत्री, वसंतराव नाईक यांच्या सरकारने ‘मराठी राजभाषा अधिनियम 1964’ सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन जणू मराठीचे राज्यभिषेक करून नाईक सरकारने मराठीचा ऐतिहासिक गौरव केला.
मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा असल्याने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा, तेलंगणा, बडोदा, इंदोर, नवी दिल्ली अशा महाराष्ट्रा बाहेरील एकूण पंधरा विद्यापीठांमध्ये मराठी शिकवली जाते.
इतिहास
^^^^^^^
मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा सुमारे २००० वर्षांपूर्वीचा आहे.
मुकुंदराजांनी विवेकसिंधु या आद्यग्रंथा द्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन १११० साली बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला.
पैठण येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्र भाषेचा प्रशासनान वापर सर्वप्रथम केला इ.स.१२५० ते १३५० हा देवगिरींच्या यादवांच्या काळात मराठी भाषेची भरभराट झाली.
राजा केसी देवरायांच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा मराठीतील पुराणतम शिलालेख आहे या शिलालेखाच्या शोधापूर्वी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वरांच्या उंच मूर्तींच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख “चामुण्डराजे करवियले” हा आद्य मराठी लेख समजला जात आहे. या शिलालेखाचा उल्लेख इ. स. 1883 च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे. हा लेख एका ओबडधोबड शिळेवर कोरला असून इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे आणि हा लेख ‘लुनया’ नावाच्या कलाकाराने कोरलेला आहे.
कुंडल संगम दक्षिण सोलापूर भीमा व सीना या दोन नद्यांचा संगमावर वसलेल्या गावात चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिर आहे. तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्य “वाछि तो विजेया होईवा ।।’ असे मराठीत आहे. त्यावर शके ९४० असे कोरले आहे, म्हणजे इ.स.१०१८ काळ असावा.
श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलचा शिलालेखांचा शोध लागला.
इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळाचरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. (भावार्थ दीपिका)
आपल्या महान संतांनी मराठी भाषेला एवढ्या उंचीवर नेले की ह्या भाषेचे सर्वश्रेष्ठ साहित्य संतांचे आहे. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली. तसेच महान संत तुकारामाची ‘गाथा’ संत नामदेव, संत रामदास इत्यादी. ह्यांचे साहित्य फक्त भक्तिमार्गच नसून आजच्या समाजाला शिकण्या सारख्या खूपच गोष्टी आहेत. उदा. संत रामदासांचे “मनाचे श्लोक” व ‘दासबोध”. स्वतः आपण कसे वागावे, संस्कृती कशी जपावी हे मनाच्या श्लोकातून कळते. तर दासबोधात मूर्ख कोणाला ओळखावे, त्यांची लक्षणे कोणती हे कळते. आजच्या तरुणांनी ह्यांचे वाचन केले व अमलात आणले तर ते आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राज्यभाषा मराठी करून साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवबांनी मराठीचा १४०० शब्दांचा राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला आणि पेशव्याने या मराठी साम्राज्याचा विस्तार केला. इसवी सन 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत भाषेचं पद दिलं. 1960 मध्ये मराठी भाषिकांचा एक संघ महाराष्ट्र राज्यात मान्यता मिळाली आणि मराठी राज्य भाषेचा मुकुट प्राप्त झाला.
कवी मोरोपंतांनी ५८ प्रकारात रामायण लिहिले.
श्रीराम जय राम जय जय राम. ही अक्षरे सुरुवातीला, शेवटाला, मध्ये,आडवी, तिडवी वापरून रामायण लिहिले किती महान ते!
कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरुपात अनेक बदल झालेले दिसतात. काळानुसार, स्थळानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी, मालवणी, वर्हाडी, कोकणी, कोल्हापुरी असे पोटप्रकार झाले. ह्यानंतर पेशवाईच्या अस्ताबरोबरच इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे मराठीत निबंध, कादंबरी, लघुकथा, शोकात्मिका हे नवे साहित्य प्रकार लिहिले जाऊ लागले.
आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. मराठी साहित्यातील नामवंत साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे, जी.ए. कुलकर्णी, पु.ल. देशपांडे, अनिल बाबुराव गव्हाणे, प्र.के. अत्रे, वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), ना.सी. फडके, रणजित देसाई, ग.दि. माडगूळकर, साने गुरुजी, भा.रा. भागवत, व.पु.काळे, राम गणेश गडकरी, विजय तेंडुलकर, चिं.त्र्यं. खानोलकर, विश्वास पाटील, शांता शेळके, दुर्गा भागवत, इंदिरा संत इत्यादींनी साहित्यात मोलाची कामगिरी केलीय. ओव्या, अभंग, कीर्तन, पोवाडे, लावण्या, इत्यादी हे फक्त मराठी भाषेतच आढळून येतात.
पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो.
भाषा संवर्धन
^^^^^^^^^^^
अग्रगण्य कवी, ज्ञानपीठ विजेते,(१९८७) महान नाटककार, कथाकार वि.वि. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज ह्यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून शासनाने जाहीर केला.
“मराठी भाषा गौरव दिन” हा फक्त एक दिवसाचा नसावा तर
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी”- सुरेश भटसाहेब मराठी भाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य असायला हवे.
जागतिक मराठी दिन म्हणून एकमेकांना शुभेच्छा देऊन मराठी भाषा दिन साजरा करतो. हा एकच दिवस करून उपयोग नाही. ही भाषा टिकवायची असेल तर आपण व सरकारने सुध्दा प्रयत्न करायला हवेत, नाही तर काही दिवसांनी मोडी सारखी मराठी ही नाहीशी व्हायला वेळ लागणार नाही.
आज मराठी शाळा ओस पडतात. सरकारने सुध्दा शाळा कमी केल्या आहेत. सरकारने मराठी भाषा संवर्धनासाठी आता दक्ष राहून जास्तीत जास्त मराठी भाषेचा प्रसार व्हायला हवा. तसे माझी ही मराठी भाषा संरक्षणाची जबाबदारी आहे. माझ्या माय मराठीची गोडी मीच जपायला हवी. मी व माझ्या मुलांबाळात मी मराठीच भाषा व मराठी संस्कृतीची जाण ठेऊन वागायला हवे. मराठी माणसांनी मराठी भाषेतूनच बोलायची सवय लाऊन घ्यायला हवी.
शिक्षणाचे जरी इंग्रजी माध्यम असले तरी स्वतः घ्या घरात सक्तिने मराठीच बोलायची शिस्त लावायला हवी. जरी व्यवहारासाठी दुसऱ्या भाषेचा उपयोग केला तरी जिथे शक्य आहे तिथे मराठीच भाषा वापरायला हवी.
माय मराठी भाषेची
जाण ठेवू घरी दारी
कारण मराठी भाषा
आहेच माझी भारी.
*आजच्या मराठी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा*
धन्यवाद🌹
शोभा वागळे
मुंबई.
8850466717