*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सरस्वतीचे अलंकार..*
सरस्वती माय माझी,
तिचे गुणगान गाते!
त्या सालंकृत रूपाचे,
ध्यान मनाशी आणते !…१
माथी बिंदू शोभतसे,
जशी बिंदी गं कपाळी!
भाळी चंद्रकोर दिसे,
ती उच्चारते न्यारी !..२
गळ्यामध्ये चंद्रहार,
जसा उपमा अलंकार!
रूपका सम शोभे ,
गळा तन्मणीचा भार!..३
हाती शोभत असे तिच्या,
गोठ पाटल्या अक्षरांच्या!
दंडामध्ये ती घाले वाकी,
खानदानी शब्दांच्या!..४
कमरेला शोभतसे,
रत्नजडित कंबरपट्टा!
यमक, उत्प्रेक्षांचा असे,
तिच्याकडे मोठा साठा!..५
पायामध्ये शोभती,
नाजूक सोनसाखळ्या!
तशा मराठी भाषेत,
योजती कोपरखळ्या!..६
सारे अलंकार तुझे,
सरस्वती तुला शोभती !
या साहित्य दरबारी,
वर्णिते ही कलाकृती!..७
उज्ज्वला सहस्त्रबुद्धे