*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना अन् रसग्रहण*
*शिवारात फुललं चांदणं*
बांधाबांधानं कपाशी फुलली
माझ्या मनाची कळी हो खुलली…
गेंदेदार हे दिसतंय शेतं
हिरवागार हा शेताचा पोतं
जणू लोण्याचे कपाशी गेंद
लेकुरवाळी ही पराटी झुलली
बांधाबांधानं कपाशी फुलली…
जणू चांदणं उतरे खाली
गेंद हसतात खुशाल गाली
सारं शिवार चांदणं होतं
चांदण्याच्या त्या रसात न्हातं
त्यात धुक्यात पहाट न्हाली
बांधाबांधानं कपाशी फुलली….
वर चंद्राची भारी मिजास
खाली शेतात चांदणं रास
हिरवाईचं कोंदण त्याला
चांद चंदेरी रसात न्हाला
त्यात अरूण लाली हो भिनली
बांधाबांधानं कपाशी फुलली…
दिवसा रात्री हे पडतं सपान
शेतं लावतंया विसराया भान
बांधाबांधानं कपाशी फुटते
नवरी चांदणी होऊन नटते
रात चांदणी शेताला भुलली
बांधाबांधानं कपाशी फुलली..
लेख लिहायला घेतला नि आधी कविताच
सुचली. मग काय? लिहूनच टाकली. होय हो,
ते लहानपणी पायी बांधाबांधावरून हिंडणं, पांढरी शुभ्र कपाशी हिरव्याकंच पराटीवर
बोंडाबोंडातून लोण्यासारखी ओसांडते आहे.
काही कळ्या काही बोंडं उमलताहेत, काही शेतात ज्वाऱ्या हिरव्यापानात तोंड लपवून डोकावून बघताहेत, बांधाजवळ कडेकडेने आईने
सालदाराकरवी लावलेली तुरीची दोनचार चाचे
लगडलेल्या शेंगांनी झुकली आहेत, शेजारीच
भगर, राळा ही दिमाखात उभे आहेत, मिरचीची
दोनचारच लावलेली रोपे पांढऱ्या फुलांनी डवरून
हलकेच इवलाली नखभर मिरची हसते डुलते आहे, जणू माझ्याकडे बघा सांगते आहे, नि मी
लहानगी अशी पायात चपलाबूट नसलेली
बांधावरून पायात काही टोचेल का या भितीने
दबकत पावले टाकते आहे, तेवढ्यात मोटेचे
पाणी धबकन् थाळण्यात पडते नि सळसळ
नागिणी सारखे मेरेतून धावत बाऱ्यात शिरून
मिरचीला पाणी देते आहे, पाणी झरा झरा मऊ मऊ काळ्या मातीत जिरते आहे, माती तृप्त झाली की पाणी आपोआप पुढच्या बाऱ्याकडे
धावते व तिथे लावलेले कांदे म्हणतात, आली रे आली पाण्याची नागीण आली,प्या आता पोटभर पाणी नि व्हा आता तृप्त, तेवढ्यात
लसूणाचे बारे म्हणते, आमच्याकडे कधी येणार,
तोवर कांदे ढाराढूर होतात नि पाणी लसूणाकडे
धावते. हे सारे दृश्य पायाला माती लागू न देता
बांधाबांधाने फिरत मी पहात असे. बारे धरणारा
व मजूर सोडला तर कुणीही पिकात पाय ठेवत
नाही कारण पिकात कसे चालायचे हे त्याला
माहित नसते, रोपावर पाय पडून पिकाचे नुकसान होते म्हणून चालणारा प्रत्येकच बांधावरून चालतो व पिक बघतो हा शेताचा
शिरस्ता आहे.
तर एकूणच बांध माझ्या नजरेत असा आहे. कुणाच्या नजरेत तो कसा आहे हे मला माहित नाही. मला तो अजून खुणावतो व ज्वारी म्हणते,
कोवळा पोघा खायचाय् ना गोड गोड, मग ये की
बांधावर नि उपस मला धाट्यातून? हुरडा तयार
झाल्यावर बांधावर बसूनच सालदाराने तिथल्या
तिथे काटक्या पाचोळा जमा करून भाजून गरम गरमच हातावर मळून फुंकर मारून आमच्या हातावर टाकताच आम्ही त्यांची “आ” करून फक्की मारली आहे. अहाहा… कित्ती मज्जा, गहू
हरबरा नि ज्वारी देखील तीळ टाकून मनसोक्त
खाल्ली आहे. अजून त्यांची चव तोंडात आहे.
माझ्या नसानसात बांध बसला आहे तो असा.
कधीच कुणाचे भांडण नाही की मारामारी नाही
की कोणी कधी बांध कोरल्याचे आठवत नाही.
सारे शेतकरी कसे गुण्यागोविंदाने नांदायचे. हं,
एखाददुसरे उनाड पोर त्रास द्यायचे पण ते तेवढ्या पुरते असायचे. आता तर ऐकावे ते नवलंच! रात्रीबेरात्री व दिवसाढवळ्याही एकमेकांचे बांध कोरून आपले क्षेत्र वाढवतात.
अहो, हे बांध आपल्या वाडवडीलांनी शेकडो वर्षांपूर्वी घातले आहेत जमिनीची वाटणी करून.
ते काही आजचे नाहीत. बांधावर सावलीसाठी
मोजकी झाडेही लावली आहेत मग असे असतांना हा अततायीपणा कशाला? कशाला
भांडणाला निमंत्रण द्यायचे.
नाही हो, आजकाल माणसाची नियतच बिघडली आहे. मी मी आणि मला मला फक्त.
हव्यास, लोभ नावाचे हे रोग भयंकर आहेत.
त्यामुळे वर्षानुवर्षे कोर्टकचेऱ्या करून दोन्ही पक्ष
बरबाद होतात पण आपल्या मीपणापुढे लोकांचे
डोळेच उघडत नाहीत त्याला कोण काय करणार?बांध म्हणजे मर्यादा. त्याच्या अश्रूंचा
बांध फुटला,तुझ्या वागण्याला बांध घाल म्हणजे आवर जरा असे आपण म्हणतोच. वागण्याला काय नि शेताला काय, बांध हवाच
ना? नाहीतर जीणे बेबंद होईल नि ते कसे परवडेल आपल्याला? म्हणून आपणही आपल्या वागण्याला बांध घालण्याचा प्रयत्न
करतो तो कितपत यशस्वी होतो हे ज्याच्या त्याच्या संस्कारांवर अवलंबून असते. संस्कार
क्वचितच बदलतात. चांगले संस्कार कायम
टिकतात.तर आपणही काही गोष्टींना बांध घालायला शिकले पाहिजे हे शेताच्या बांधावरून पचनी पडले तरी खूप झाले. आता हा
बांध प्रपंच थांबवते नि निरोप घेते.
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)