You are currently viewing सखीने घातला पुरणपोळीचा घाट.

सखीने घातला पुरणपोळीचा घाट.

सखीने घातला पुरणपोळीचा घाट.
चण्याची डाळ रटमटली टोपात
डाळ शिजता बोटाने दाबली
शिजली बाई म्हणत,
गुळाची ढेप चिरली
गुळाची नी डाळीची झाली एकी
त्यावर शिंपडली पूड वेलचीची
जायफळही जरासं घातलं किसून
पाट्यावर घेतलं एकसारखं वाटून
कणिक कशी छान तिंबली
वरवंट्याने तिला मस्त ठेचली
पारीत भरलं मऊशार पुरण
पोळपाटावर ठेवलं सुतीकापड
एकेक पोळी हळूवार लाटली
थोडीसी माया तिच्यावर पेरली
गरम तव्यावर जराशी शेकली
परतताच कशी टम्म फुगली
तुपाची धार पोळीवर धरली
यजमानांच्याच्या पानात हलकेच वाढली
वाटी ठेवली आमरसाची
यजमानांनी पोळीचा घास केला
हलकेच आमरसात न्हाऊ घातला
घास तोंडात फिरताफिरता
थेट लागली ब्रह्मानंदी टाळी
भार्या म्हणे, अहो घ्या की कटाची आमटी
कटाच्या आमटीचा भुरका मारला
झणझणीत कट रंध्रात भिनला
यजमानाने हात हळूच धरीला
भार्या वदे, अहो सोडा ना गडे!
अनुराग उमटला कपोलांवरी
डोळ्यांत खट्याळ भाव उतरती
प्रीतीचा घास सख्याने भरविला
चेहरा सखीचा गोरामोरा झाला
उतू चाललेलं खुसखुशीत प्रेम पाहूनी
पानातली पुरणपोळी खुदकन हसली

——-गीता गजानन गरुड.
*संग्रह अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

प्रतिक्रिया व्यक्त करा