सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील देवसू प्राथमिक शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ. प्रणिता राहुल मांडवकर यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर झाला असून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणासाठी सौ. प्रणिता मांडवकर यांनी देवसू प्राथमिक शाळेमध्ये केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची तसेच आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
१८ मे २०२५ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या सन्मान सोहळ्यामध्ये सौ. प्रणिता मांडवकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसे निवडपत्र त्यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने प्राप्त झाले असून सौ. प्रणिता मांडवकर यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे देवसु प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण ठाकूर, सहाय्यक शिक्षक रोशनी राऊत, अमिशा राऊळ, शिक्षक पालक समिती, शाळा व्यवस्थापन समिती व देवसू ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.