अंगणवाडी मदतनीससाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
देवगड तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी मदतनिस पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छूक व पात्र महिला उमेदवाराकडून दिनांक १४ ते २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवगड कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन देवगड एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी बाबली होडावडेकर यांनी केले आहे.
एकूण २९ पदांसाठी ही भरती होत असून पात्र व इच्छुक उमेदवाऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, स्वतःची स्वाक्षरी करून सादर करणे आवश्यक आहे. (सोबत अर्जाचा नमुना) अर्जासोबत लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापत्र जोडणे अनिवार्य आहे. अर्जासोबत जन्म नोंदीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र सत्यप्रत,उमेदवार त्याच महसुली गावातील कायम रहिवास असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सोबत जोडण, पोलीस पाटील यांच्याकडील कायम रहिवास दाखला, विवाहीत असल्यास विवाह नोंदणी दाखला, जोडणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता- अंगणवाडी मदतनिस व अंगणवाडी सेविका पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष), अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. वास्तव्याची (स्थानिक रहिवाशी असणे) अट:- अर्जदार फक्त त्याच गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव, कायम रहिवाशी असेल त्यांनाच स्थानिक समजावे. स्थानिक शब्दाचा अर्थ संपूर्ण महसुली गाव ज्यात वाडी, वस्ती, पाडे यांचा समावेश असेल, ते स्थानिक समजण्यात यावेत. वयाची अट :- अंगणवाडी मदतनिस व अंगणवाडी सेविका या पदांसाठी सरळ नियुक्तीसाठी (By nomination) वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे अशी राहील. तथापी विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० वर्षे अशी राहील. (दिनांक १४/२/२०२५ अखेर).
लहान कुटुंब – अंगणवाडी मदतनिस व अंगणवाडी सेविका या पदांसाठी लहान कुटुंबाची अट पुढीलप्रमाणे लागू राहील. लहान कुटुंब याचा अर्थ, उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये. उमेदवाराला दोन हयात अपत्यापेक्षा (दत्तक दिलेल्या अपत्यासह) अधीक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही. जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल. तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य (दत्तक दिलेल्या अपत्यांसह) असून देखील तिसरे अपत्ये झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात. अर्जासोबत लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक आहे. विधवा व अनाथ उमेदवारांबाबत तरतूद :- विधवा व अनाथ उमेदवारांच्या बाबतीत अशा उमेदवारास शासन निर्णया नुसार १० अतिरिक्त गुण कागदपत्र पडताळणी अंती पहिली गुणवत्ता यादी तयार करताना देण्यात येतील. बदली :- अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहिवाशी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही.अंगणवाडी कर्मचारी यांना नियुक्तीचा लाभ देण्यात आल्यानंतर त्यांचे निवासस्थानापासून नियुक्ती देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणताही प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. अधिक माहितीसाठी संबंधित सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय दूरध्वनी ०२३६४-२६२३१२/८९७५२४६०२६ क्रमांक वर संपर्क साधावा.