*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित मुक्तचिंतन*
*मुक्त चिंतन …*
होय मी कवी आहे
तुमची साथ मला हवी आहे
जातीपातीच्या भिंती पाडण्यासाठी
विद्रोह आणि विध्वंस गाडण्यासाठी
कवी म्हणून माझी जबाबदारी मोठी आहे..
होय मी कवी आहे
अभिमानाने सांगतो मी
समाजातील सुखदु:खे मांडतो मी
कधी स्वत:शी कधी समाजाशी भांडतो मी
अदृश्य अशा शक्तिंच्या डोळ्यात अंजन
घालतो मी.. कारण मला माझ्या जबाबदारीची
जाणीव आहे,… होय मी एक कवी आहे..
माझ्या लेखणीचे सामर्थ्य महान आहे,
तीच माझी तलवार आणि म्यानही आहे,
कुठे तुटून पडायचे, कुठे सावरायचे याचे मला
भान आहे.. माझ्यासाठी सारे मोकळे रान आहे,
माझी लेखणी नि शाई माझे प्राण आहेत,
कुठे ठेचायचे, ठोकरायचे, गोंजारायचे, निशाणा
साधायचा ह्या साठी जहाल लेखणी हेच माझे
साधन आहे.. होय, मी एक कवी आहे…
कवी म्हणून मी समाजाचे नितांत देणे लागतो,
समाजहितासाठीच मी माझी लेखणी वापरतो,
दुष्ट शक्तिंवर तुटून पडतो, साम दाम दंड भेद
सारी हत्यारे वापरतो, स्वाभिमान गोंजारतो, अहंकार ठेचतो, सधुत्वाचा बुरखा फाडतो, त्यांना
ताडतो, पिळतो, लक्षात आणून देतो, हे वागणे
बरे नव्हे.. नेहमीच नाही मिळत ओढून ताणून हवे
हवे, त्या साठी सिद्ध करावी लागते लायकी..
फुकट मिळत नसतात मानसन्मान..हेच नसते
त्यांना ठाऊकी.. म्हणून मी माझी लेखणी परजतो नि मोठ्याने गरजतो.. कारण मी कवी
आहे.. साऱ्यांनाच जबाबदारीची जाणीव करून
देणे ही गोष्ट हवी आहे.. होय मी एक कवी आहे…
अभ्यासाची पुस्तकांची साधन संपत्ती वापरावी,
हेच जनांना माहित नसते, तुटपुंज्या ज्ञानावरच त्यांना चढाई करायची असते, इथेच मग सारे
गणित फसते, दुनिया मौन, पण हसते, हेच त्यांना
कळत नसते, साधना केल्याशिवाय का कुणाला
फळ मिळते? नाहीतर सारेच ज्ञानेश्वर झाले असते.. आपण ज्ञानेश्वर होऊ शकत नसलो तरी
“ज्ञ” पासून सुरूवात करायला काय हरकत आहे? अहो, आयुष्य हे महान आहे. शिकण्याला
कधीच वय नसते, ज्ञानी होणे ही आपली सोय
असते, मला ज्ञ पासून ज्ञानाची सुरूवात हवी आहे, होय, मी एक कवी आहे…
कवी म्हणून मी माझी जबाबदारी कधीच
झटकणार नाही, तुम्ही पण झटकू नका, सर्व
मिळून घेऊ समाजसुधारणेचा वसा,अहो, कोणतीही क्रांती घडवणारी ही लेखणी फार
महान आहे,आपणच सावरकर, साने गुरुजी होऊ या,संसदेत मागण्या घेऊन गर्जू या, जमेल त्या
माध्यमातून लोकशिक्षण करू या, हाच आपला वसा, त्या साठीच लेखणी घासा, मग सुटेल पहा
दुष्ट शक्तिंचा फासा, त्या साठीच माझ्या हाती
लेखणी आहे, होय, मी एक कवी आहे…
होय, मी एक कवी आहे…
केवढे महान आहे हे, लेखणी नावाचे शस्र,
रूख्मिणीने लिहिले फक्त एक पत्र…
धावून गेला श्रीहरी रथ घेऊन नि प्रियेला घेऊन
आला, पराभूत केल्या साऱ्या बला…तिचे एक
तुळशीचे पान तारून गेले”तुला”…अशा या
लेखणीवरच ठेवा निष्ठा, तारून नेईल तोच
तुम्हाला पाऊल न वाजता….. न काढता खस्ता…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)