काळाच्या पडद्याआड.
सावंतवाडी शहरात गेल्या दोन दशकाहून जास्त काळ ठेकेदारी क्षेत्रात आपल्या प्रामाणिक कामामुळे आणि हसतमुख व्यक्तित्वामुळे सर्वांच्याच परिचयाचा झालेला तसेच सावंतवाडी बरोबरच आजूबाजूच्या गावागावात, जिल्हाभरात काम केलेल्या प्रत्येक ठिकाणी आपली वेगळी छाप सोडणारा राजू राणे आज अनंतात विलीन झाला. राजू राणे म्हणजे सदैव हसतमुख, सुस्वभावी, शांत, प्रसन्न व्यक्तिमत्त्व.
माडखोल, डुंगेवाडी येथील मूळ रहिवासी असलेला राजू सर्वोदय नगर येथे घर बांधून राहत होता. आंबोली येथून परतत असताना नेहमी दुचाकी चालवणारा राजू दुचाकीच्या मागे बसला असता, टेकडीवरून अचानक पडलेला दगड दुचाकी चालविणाऱ्या कामगाराच्या डोक्यात पडला आणि राजू मात्र अपघातातून बचावला होता. मध्यंतरी पत्नीचेही निधन झाल्यामुळे राजूवर एका मागोमाग एक आघात होत राहिले. तरीही आपले काम हीच सेवा समजून कामात गर्क असणारा राजू जीवनातील संकटांचा हसतमुखाने सामना करायचा. रस्त्याने येता जाता आपल्या ओळखीच्या प्रत्येक माणसाला हसत हात दाखवत, मोठ्याने हाक मारूनच राजू पुढे जायचा. मग ती व्यक्ती कोणीही मोठी असो वा एखादा आपला कामगार. त्याला कधीच मोठेपणा शिवला नाही, त्यामुळेच राजू आपल्या कामगारांमध्येच नव्हे तर मित्रपरिवारात देखील सर्वांना प्रिय होता.
दत्तजयंती दिवशी माडखोल दत्त मंदिरातून बाहेर पडताना अचानक वेगात आलेल्या कारने राजूला जोरदार धडक दिली आणि त्यातच गंभीर जखमी झालेल्या राजूला प्रथम व्हिजन हॉस्पिटल व लगेचच गोवा बांबुळी येथे अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले होते. तब्बल २३ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजुची तब्बेत सुधारली असे वाटत असतानाच अचानक पुन्हा अत्यावस झालेल्या राजूने दिनांक २१ जानेवारी रोजी दुपारी अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कुटुंबासह मित्रपरिवारास सोडून कायमचाच निघून गेला.
बांधकाम क्षेत्रात एक प्रामाणिक ठेकेदार म्हणून राजुची ओळख आहे. आपल्या कामाप्रति राजू खूपच गंभीर असायचा. कामाशिवाय त्याच्यासाठी दुसरे महत्वाचे असे काहीच नव्हते. कामावर प्रेम करणारा राजू आपल्या कामगारांवरही खूप माया करायचा. राजूच्या जाण्यानंतर त्याच्यासाठी धावून येणारे, रडणारे, हलहळणारे कामगार पाहिले की राजूवर कामगारांचा किती जीव होता हे लक्षात येते. कुठलेही काम संपले की राजू कामगारांना आवर्जून जेवणावळी घालायचा आणि स्वतः देखील त्यांच्यासोबतच जेवायचा. कित्येक कामगारांसाठी राजू हा आधारवड होता. सरकारी कामांचे बिल झाल्यावर यादी बनवून आपण घेतलेल्या मटेरियलचे, कामगारांचे पैसे सर्वप्रथम देणारा राजू हा एकमेव असेल, लोकांची देणी दिल्यानंतर आपल्या हातात काय उरेल याची त्याला चिंता नसायची. त्याच्या स्वभावामुळे आणि प्रामाणिक कामांमुळे सरकारी कार्यालयात देखील त्याची बिले कधी रखडत नव्हती. मित्रांचा तर त्याच्यावर खूप जीव होता. राजुचा अपघात झाल्यापासून कितीतरी मित्र त्याला भेटायला गोवा बांबुळी येथे जात असायचे, त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करायचे.
आज राजू गेल्याची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली आणि अनेकांचा काळजाचा ठोका चुकला. राजूचे जाणे अनपेक्षित. कित्येकांना हुंदका आवरता आला नाही. राजूचे अंत्यदर्शन घेताना अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. राजुच्या अंत्यदर्शनासाठी माडखोल येथील डुंगेवाडी येथे संध्याकाळी काळोख झाल्यावरही झालेली शेकडो लोकांची गर्दीच राजूच्या माणुसकीची पोचपावती देऊन जाते. गोरगरीब कामगारांपासून ते मोठमोठे नामांकित ठेकेदार, बँकेचे कर्मचारी, सरकारी कार्यालयांचे अधिकारी, सावंतवाडी नगरपालिकेचे अनेक कर्मचारी, कित्येक गावांतील सरपंच, राजुचा भला मोठा मित्र परिवार, राजुचे हितचिंतक त्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी धावून आले होते.
सकाळी ५.०० वाजता राजूचा दिवस सुरू व्हायचा, ६ वाजल्यापासून रोज राजुची कामावर जाण्यासाठी घाई असायची. परंतु नियतीने त्याची ती तळमळ अचानक थांबवली. राजू गेला…..आणि ठेकेदारीच्या दुनियेतील प्रामाणिक माणूस आणि मैत्रीच्या दुनियेतील दिलदार, राजा माणूस काळाच्या पडद्याआड झाला. राजू गेला तरी त्याच्या प्रियजनांच्या आणि मित्रपरिवाऱ्याच्या आठवणी तो कायमच अमर असेल….
परमेश्वर राजूच्या आत्म्यास सदगती देवो,
आणि त्याच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची आणि त्यातून सावरण्याची शक्ती प्रदान करो…!!

