*शिवराय हे लोकशाहीचे उद्गाते- राजेंद्र घावटे*
निगडी:
“अठरापगड समाजाला एक करून लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श शिवरायांनी निर्माण केला. स्वत्व आणि स्वाभिमान यांची पेरणी करत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. लोककल्याणकारी राज्य व्यवस्थेचा आदर्श निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाही समाज व्यवस्थेचे उद्गाते ठरतात.” असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले आहे.
दुर्गा टेकडीवरील सर्वोच्च ठिकाणी असलेल्या सुप्रभात योग मंदिर या ठिकाणी आयोजित शिवजयंती कार्यक्रमात घावटे यांचे “युगप्रवर्तक छत्रपती शिवराय” या विषयावर व्याख्यान झाले. सुप्रभात मित्र मंडळ व सूर्यनमस्कार ग्रुप च्या वतीने शिवजयंतीच्या सूर्योदयाला कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाहीर प्रकाश ढवळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक मोहिते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. रवींद्र मोहिते, भगवान पठारे, संपत शिंदे, अंकुश बंडगर, बाबा नायकवडी, विजय शिंदे , राकेश भोंडवे, पवन पवार, गजानन ढमाले ज्ञानेश्वर सावंत सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र मोहिते यांनी केले.
राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, ”
शिवरायांनी अनेक प्रस्तापित सत्तांशी लढा दिला. त्यांच्या कार्यामुळे आणि प्रेरणेमुळे पराभूत मानसिकता बदलली. मरगळ दूर सारून प्रतिकूल परिस्थितीत स्वकीयांचे राज्य निर्माण केले. आक्रमणाची दिशा बदलून इतिहासाचे प्रवाह बदलल्या मुळे शिवरायांना युगप्रवर्तक म्हटले जाते. हिंदवी
स्वराज्य हे राजमाता जिजाऊ यांच्या निर्धाराचं प्रतीक आहे. शिवरायांचा इतिहास हा शक्तीचा, भक्तीचा, युक्तीचा असून अतुलनीय शौर्याचा आणि धैर्याचा आहे. जगात अनेक शूर पराक्रमी राजे होऊन गेले. परंतु त्यांच्या पश्चात त्यांची राज्ये टिकली नाहीत. शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर अनेक वर्षे मराठे लढले आणि स्वराज्याचा विस्तार केला. दिल्लीसह देशाच्या बहुसंख्य भाग पुढील काळात मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. शिवरायांच्या चरित्रातून अनेक महापुरुषांनी प्रेरणा घेतली. शिवचरित्रामध्ये भारतवर्षाचे अखंड मार्गदर्शन करण्याची ताकद आहे.” असे सांगत त्यांनी शिवचरित्रातील अनेक प्रसंग सांगितले.
शाहीर प्रकाश ढवळे यांनी शिवचरित्रातील रोमहर्षक प्रसंगांचा आढावा घेत पोवाडा सादर केला.
बालमावळे श्लोक विशाल शिंदे व कु. शुभ्रा सागर नायकवडी यांनी शिवचरित्रातील विरश्रीपूर्ण प्रसंग सादर केले.
सुप्रभात मित्र मंडळ , सूर्यनमस्कार संघ व रोज सकाळी टेकडीवर येणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतें….

