– आमदार वैभव नाईक
सिंधुदुर्गनगरी
पाणी हा गावांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. जिल्ह्यामध्ये असलेल्या भूमिगत पाण्याच्या स्त्रोतांचा आढावा घ्यावा आणि जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कशा प्रकारे करता येईल हे पहावे अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज जल जीवन मिशनच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री. नाईक बोलत होते.
या बैठकीस निमंत्रीत सदस्य प्रसाद देवधर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, प्र. अपर जिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठाकूर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपात पाताडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नितीन उपरेलु, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विजय नांद्रेकर यांच्यासह समितीचे सदस्य व निमंत्रीत उपस्थित होते.
जनतेला गुणवत्तापूर्ण व सातत्याने पाणी पुरवठा करणे हे या मिशनचे उद्दीष्ट आहे. त्यादृष्टीने जास्तीत जास्त गावांमध्ये नळपाणी योजना राबवण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समितीने प्रयत्न करावेत. तसेच जेथे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत तेथे पाईपलाईनचा खर्च निधीतून करावा, यासाठी सर्वेक्षण करून अहवाल तयार करावा, सिंधुदुर्ग किल्ल्यावरही पाणी पुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव करावा. त्यासाठी समुद्रात पिलर उभे करून वरून दीड ते दोन इंच पाईप लाईन टाकावी यासाठी प्रस्ताव करावा, अशा सूचना यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिल्या.
जिल्ह्यातील ग्रामस्थांनी नळपाणी योजनेसाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस पाणी टंचाईची परिस्थिती असते. त्यावेळी नळपाणी योजनेचा लाभ होणार आहे. तसेच वर्षभर नळाद्वारे पाणी मिळेल. यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन करावे आणि जास्तीत जास्त गावांचे प्रस्ताव कसे येतील यासाठी काम करावे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी दिल्या. तसेच जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील लोकांनी नळपाणी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याबैठकीमध्ये तिलारी पाणी पुरवठा योजना, देवबाग, तारकर्ली, वायरी, सर्जेकोड, रेवंडी या गावांची पाणी पुरवठा योजना, विजयदूर्ग पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती या विषयीही चर्चा करण्यात आली.