संतांचे विचार आचरणात आणण्याची गरज : परशुराम चव्हाण
सावंतवाडी समाजमंदिरात संत रोहिदास यांचा ६४८ वा जयंती उत्सव साजरा
सावंतवाडी
संत शिरोमणी रोहिदास यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपत जातिभेद व धर्मभेद मिटवण्यासाठी सनातनी समाजाविरोधात बंड केले. सतीच्या चालीचे अवडंबर माजू दिले नाही. अशा संत रोहिदासांसारख्या संतांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. अशा या थोर संतांची शिकवण समाजाने अंगीकारून अनिष्ट रूढी परंपरांना तिलांजली द्यावी, असे आवाहन संत शिरोमणी रोहिदास यांचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ निवृत्त शिक्षक परशुराम बी. चव्हाण यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा सावंतवाडी तालुका समाज मंडळाच्यावतीने सावंतवाडीतील समाज मंदिरात संत रोहिदास यांच्या ६४८ वी जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी समाज मंडळाचे अध्यक्ष गणेश म्हापणकर , सचिव गुंडू चव्हाण, जिल्हा कार्यकारी सह सेक्रेटरी बाबुराव चव्हाण , मार्गदर्शक विजय चव्हाण , लक्ष्मण आरोसकर, नरेश कारिवडेकर, दिलीप इन्सुलकर, डॉ. शरद जाधव, शेखर दाभोलकर, विजय ओटवणेकर, राजकुमार चव्हाण, राजेश फोंडेकर, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाज मंडळाचे तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीप प्रज्वलन झाले. यावेळी प्रास्ताविकात मंडळाचे सचिव गुंडू चव्हाण यांनी संत रविदास यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या “अनटचेबल” ग्रंथामध्ये संत रोहिदास यांचा खास उल्लेख करण्यात आलेला आहे संत रोहिदास यांनी जागतिक संत संमेलन घेण्याचा मान मिळवला आहे तर सिकंदर लोधी या महाराजाचा राजगुरू असलेल्या संत रोहिदास यांना त्यांनी दिल्ली तुकलताबाद येथील बारा एकर जमीन गुरुदक्षिणा म्हणून बहाल केली होती तर मक्का या मुस्लिम धर्मियांच्या पवित्र स्थानाच्या ठिकाणी सिकंदर लोधी यांनी संत रोहिदास यांना नेले. त्यांच्यासोबत संत कबीर ही होते असेही चव्हाण म्हणाले.
आभार प्रदर्शन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी केले.