याचसाठी का?
संपादकीय…..
सावंतवाडीत सत्ता बदल झाल्यानंतर मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आणि आपली तुंबडी भरायची अशीच परिस्थिती आज सावंतवाडी शहरात पहायला मिळत आहे. सावंतवाडीकर जनतेला आम्हाला एकदा संधी द्या आम्ही विकास करून दाखवतो अशी दिवास्वप्ने दाखवत सावंतवाडी शहरात जिकडे तिकडे मटक्याच्या टपऱ्या उभ्या केल्या बाकीची आश्वासने मात्र हवेत विरली. गेली 23 वर्षे केसरकरांची सत्ता असताना सावंतवाडीचा विकास कित्येक पटीने झाला, परंतु रोज डाळ भात खाण्यापेक्षा कधीतरी चिकन मटण देणाऱ्याकडे लोक धावतात त्याचप्रमाणे लोकांनी बदल घडवून आणला आणि त्याचे दुष्परिणाम आज सावंतवाडीकर याची डोळा पाहत आहेत.
एकीकडे सावंतवाडीतील मागास समाजाचा एक उच्चशिक्षित तरुण न्यायासाठी नगरपालिका प्रशासनाच्या आणि नगराध्यक्षांच्या विरोधात नगरपालिकेसमोर उपोषणाला बसला आहे, तर दुसरीकडे स्थानिक तरुणांना रोजगार देण्यापेक्षा सत्ताधारी आपली तुंबडी भरण्यासाठी परप्रांतीय मालानी नावाच्या इसमास भर बाजारपेठेतील बंदावस्थेत असलेल्या जुन्या बस थांब्याची जागा केवळ ३०००/- प्रति महिना भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत घेतात, आणि परप्रांतीय लोकांना रोजगार उपलब्ध करून देतानाच स्थानिक उच्चशिक्षित तरुणांना मात्र रोजगारासाठी, पोटापाण्याच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावयास भाग पाडत आहेत.
सावंतवाडी नगरपालिकेच्या मालकीची जुन्या बस थांब्याची भर बाजारपेठेतील जागा लिलाव प्रक्रिया न करता, जागेसाठी कोणतीही अनामत रक्कम न घेता केवळ ३०००/- रुपये मासिक भाड्याने देण्याचा ठराव घेते आणि देते. म्हणजे नक्कीच यात पालिकेला उत्पन्न मिळण्यापेक्षा छुप्या मार्गाने जागा भाड्याला देणाऱ्यांना उत्पन्न मिळालेलं असणारच. नगराध्यक्ष संजू परब पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी स्थानिक लोकांच्या इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स मधील गाळ्यांकडून सुधारित प्रीमियम आणि भाडेवाढीसाठी आग्रही आहेत, मग पालिकेची जागा परप्रांतीय व्यापाऱ्याला देताना हे परप्रांतीय व्यापारी त्यांचे जावई आहेत का? पालिकेचे उत्पन्न बुडते अशी सावंतवाडी वासीयांची दिशाभूल करून आपण शहराच्या भल्याचाच विचार करतो असा आव आणायचा आणि स्थानिकांना डावलून आपली पोटं भरण्यासाठी गैरमार्गाने परप्रांतीयांना पालिकेच्या मोक्याच्या जागा कोणतीही अनामत रक्कम न घेता द्यायच्या म्हणजे हा स्थानिकांवर घोर अन्याय आहे. आपण उच्चशिक्षित आणि सावंतवाडीकर अडाणी असाच समज असलेल्या नगराध्यक्षांनी सावंतवाडीसारख्या शांत सुशिक्षित, सुसंस्कृत शहरात गेल्या कित्येक महिन्यात वादविवाद करण्याखेरीज दुसरं काय केलं असा प्रश्न आज सावंतवाडीकर विचारू लागले आहेत.
विकासाच्या नावावर शहरातील जागा परप्रांतीय लोकांना देणे, स्थानिक भाजीवाल्यांना वाऱ्यावर सोडून बाहेरून आलेल्या लोकांना फळे, भाजीपाला इत्यादी रस्त्यावर विकण्यास मुभा देणे यासारख्या असंस्कृत कृत्यांमुळे सावंतवाडी शहराची बदनामीच होत असून शहराच्या इतिहासाला बाधा निर्माण होत आहे. सत्ताधारी लोकांची शहरातील वाढलेली दादागिरी, दडपशाही यावर सावंतवाडीकर जनतेने नक्कीच विचार करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा भविष्यात सवंतवाडीतच सावंतवाडीकरांना स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी परकीयांकडे आश्रय मागण्याची वेळ येईल आणि राजकारणी मात्र आपल्या तुंबड्या भरून खुशाल नामानिराळे राहतील.