जिल्ह्यात पर्यटकांना झालेली मारहाण अशोभनीय, दोषींवर कडक कारवाई करावी.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.
वैभववाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना झालेली मारहाण ही घटना अशोभनीय आहे. यामधील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे. जिल्ह्याची बहूतांश अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. जिल्ह्यात येणारा पर्यटक हा एक ग्राहक असून त्याला योग्य सेवा देणे आवश्यक आहे. अतिथी देवो भव: ही आपली संस्कृती असून या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना अशोभनीय आहे.
या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून केस दाखल केल्याबद्दल पोलीस यंत्रणेचे अभिनंदन आणि आभार.
जिल्ह्यात दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देऊन पर्यटनाचा आस्वाद घेतात. या पर्यटन वाढीसाठी सर्वांचे प्रयत्न आणि सहकार्य अपेक्षित आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनी आणि येथील व्यवसायिकांनी सुद्धा कायदा हातात घेऊ नये. काही तक्रार, वाद उद्भवल्यास पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत याची संबंधित विभागांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि राज्य सहसचिव व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रा.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री.सीताराम कुडतरकर, संघटक श्री. विष्णुप्रसाद दळवी व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केले आहे.
—————————