*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*द शो मस्ट गो ऑन*
*कॅलिडोस्कोप*
*आमच्या वेळी असे नव्हते* हे वाक्य मागच्या पिढीकडून आजची पिढी अगदी सतत ऐकत असते. हे अगदीच खरे आहे की आमच्या वेळी असे नव्हते, पण याचा अर्थ असा समजायचा का, की जी परिस्थिती आज आहे ती सर्वतोपरी वाईटच आहे? आणि आमच्या वेळी जे काही होते ते चांगलेच होते? हो म्हणणाऱ्यांना असेच म्हणायचे असते. मला मात्र व्यक्तीश: हे मुळीच पटत नाही.
आपण डार्विनची उत्क्रांतीची थियरी शिकलो आहोत. जसजसा काळ लोटला, तसतशी प्रगती होत गेली. माकडाचे शेपूट गळून पडले आणि त्यातून मानव निर्माण झाला. या आदिमानवाला शरीरावर कपडे घालण्याचे ज्ञान नव्हते. जसजसा तो जंगलात एकत्र राहू लागला
तेव्हा त्याच्या मनात लज्जा भाव निर्माण झाला
आणि तो लज्जा रक्षणासाठी झाडाच्या पानांचा वापर करू लागला. अग्नि कसा निर्माण होतो हे त्याच्या लक्षात आले. कच्च्या मांसापेक्षा भाजलेल्या मांसाची चव अधिक चांगली लागते
हेही त्याच्या लक्षात आले, अशाप्रकारे त्याची प्रगती होत गेली आणि आज एकविसाव्या शतकात आपण हे इतके निराळे विकसित जीवन उपभोगत आहोत. माणसाने त्याच्या बुद्धीचातुर्याने इतका विकास केला की आज विज्ञान युगात माणूस मंगळावर जाऊन पोहोचला.
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतातच.
एक सकारात्मक तर दुसरी नकारात्मक. आज या विकासामुळे आपला भारत जगातील इतर राष्ट्रांसोबत प्रगत राष्ट्र म्हणून ताठ मानेने उभा आहे. माणसामाणसातील संपर्क सहज आणि सुलभ झालेला आहे. आज दूर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. आता कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला, त्याचा गैरवापर होऊ लागला तर दुष्परिणाम होणारच नाही का? यासाठी होणाऱ्या विकासास नावे ठेवून, दोष देणे याला काय बरे अर्थ आहे?
ही गोष्ट सत्य आहे की माणसाला जसजसे मिळत गेले, तसतशी त्याची हाव वाढत गेली. तो अधिकाधिक आत्मकेंद्रीत होत गेला. मी आणि माझे या व्यतिरिक्त त्याला आजूबाजूची परिस्थिती दिसेनाशी झाली. ही सत्य परिस्थिती असली तरी समाजातील प्रत्येकच माणूस असा नाही हेही तितकेच खरे आहे. माणुसकी, परोपकार, समाजसेवा या भावना आजही जिवंत आहेत.
” आमच्या वेळी असे नव्हते” हे विधान प्रत्येक वेळी कसे काय खरे ठरू शकते?
अहो आमच्या वेळीही भाऊबंदकीमुळे भावा- भावात वडील- मुलात भांडणे होत नव्हती का?
इतिहासही या गोष्टींचा साक्षी आहे. आनंदीबाई ने ध चा मा कशासाठी केला? शिवरायांच्या स्वराज्यात वतनदारीसाठी फितुरी झालीच ना?
रामायण, महाभारत का घडले? गादीसाठी, राज्यासाठीच ना? ही माणसा माणसांची प्रवृत्ती आहे. कौरवांनी पांडवांना इतका त्रास देऊनही
अर्जुनाच्या मनात कुरुक्षेत्रावर, ” मी माझ्याच बांधवांना कसे मारावे” हा संभ्रम निर्माण झाला याचाच अर्थ बुरा असतो तसाच भलाही असतोच.
आज पैशापाठी धावणाऱ्या लोंढ्या सोबत
डॉक्टर बाबा आमटे यांनी उभारलेले आनंदवन, डॉक्टर प्रकाश आमटे यांचे हेमलकसा, अनिल अवचटांचे मुक्तांगण पीडितांसाठी कार्यरत आहे हे आपल्याला कसे विसरता येईल?
चाळीत राहणारा माणूस आज बंद फ्लॅटमध्ये राहू लागला. चाळ संस्कृती वेगळी आणि फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांचे राहणीमान वेगळे.
चाळीतून फ्लॅटमध्ये आल्यावर दोहोतील फरक स्वीकारणे मागील पिढीतील लोकांना थोडे अवघड गेले असले तरी सकारात्मक विचार केला तर या बदलातही जमेची बाजू नक्कीच दिसून येईल.
दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, या महागाईने सामान्य माणूस पिडला आहे हे सत्य आहे, पण याच बरोबर लोकसंख्येची होणारी वाढ
आपण लक्षात घ्यावयास नको का? मागणी वाढली, की पुरवठा कमी होतो, आणि सहाजिकच मालाची किंमत वाढते हा अर्थशास्त्राचा अगदी साधा सोपा नियम आहे.
त्यामुळे आमच्या वेळी दहा रुपये प्रति लिटर मिळणारे दूध आज पन्नास रुपयांनी मिळते ही तक्रार फोल आहे असे माझे मत आहे.
थोडक्यात काय? जीवनाचा हा खेळ कॅलिडोस्कोप प्रमाणे आहे. तो जसा फिरवावा तसे प्रत्येक वेळी नवे चित्र आपल्याला दिसते. काळ बदलला, जीवनाचे चित्र बदलले. हा बदल आनंदाने स्वीकारणे आणि पुढे जाणे हेच आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
द शो मस्ट गो ऑन……
अरुणा मुल्हेरकर
मिशिगन.

