You are currently viewing शिवसेनेच्या नेत्यांमध्ये विकास करण्याची कुवत नाही….

शिवसेनेच्या नेत्यांमध्ये विकास करण्याची कुवत नाही….

कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवली आहे – निलेश राणे

सिंधुदुर्ग :

कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवली आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांची विकास करण्याची कुवत नाही,” अशी घणाघाती टीका माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी केली.

राज्यात नकुत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यावेळी राज्यात स्थानिक पातळीवर राजकरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीत बड्या नेत्यांचा प्रत्यक्षपणे सहभाग नसला तरी, सर्व पक्षांचे नेते या निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. निकाल हाती आल्यानंतर राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चांगल्या जागा जिंकल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. “कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवली आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आणि दीपक केसरकर यांची विकास करण्याची कुवत नाही,” अशी खोचक टीका त्यांनी शिवसेना नेत्यांवर केली.

राणेंवर टीका करण्याचे दिवस संपले
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना निवडणुकीच्या मुद्द्यावरुन चांगलंच घेरलं. शिवसेनेच्या नेत्यांनी फक्त राणेंवर टीका करण्यात वेळ घालवला. याच कारणामुळे त्यांना जनतेनं नाकारलं,” असा दावा राणेंनी केला. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी राणे कुटुंबावर खोटीनाटी टीका करुन मतं मिळवण्याचे दिवस संपल्याचेही निलेश राणे म्हणाले.

नितेश राणे, वैभव नाईक यांच्यात शाब्दिक युद्ध
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आल्यानतंर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली होती. “नितेश राणेंच्या मतदारसंघात 3 ग्रामपंचायतींपैकी 2 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत. गेल्या 2 निवडणुकीत राणेंना सातत्याने धक्का दिला आहे. त्यामुळे राणे यांचं अस्तित्व संपलं आहे,” असं वैभव नाईक म्हणाले होते. त्याला उत्तर म्हणून, राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आला नसल्याचा थेट वार नितेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर केला होता. “जिल्ह्यात 70 पैकी 57 ग्रामपंचायती भाजपने जिकंल्या आहेत. आम्ही शिवसेनेला धक्का दिल्ला आहे. यापूर्वी शिवसेनेकडे असलेल्या ग्रामपंचायती यावेळी भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे राणेंना धक्का देणारा अजून कुणी जन्माला आलेला नाही,” असे नितेश राणे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा