You are currently viewing माजी मंत्री श्री बाळासाहेब थोरात : एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व 

माजी मंत्री श्री बाळासाहेब थोरात : एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व 

 

यावेळेस झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो माणूस निवडणूक जिंकला नाही पण तरी चर्चेत होता त्या माणसाचे नाव आहे श्री बाळासाहेब थोरात. बाळासाहेबांचे कार्य इतके विशाल आहे की त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव होऊनही त्यांच्या नावाची चर्चा पत्रकारांमध्ये समाज माध्यमावर व लोकांमध्ये होत होती. अतिशय विनम्र हसतमुख आणि सुसंस्कृत असलेला हा माणूस गेल्या वीस वर्षापासून माझ्या संपर्कात आहे.

मी राजकारणात नाही. परंतु राजकीय व्यक्तींशी माझे संबंध आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख यांच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्न समारंभाला मा.ना. श्री बाळासाहेब थोरात येणार होते. त्यांना रिसीव करून व त्यांना वरुडला बरोबर घेऊन येणे ही जबाबदारी माझे मित्र श्री नितीन हिवसे यांच्यावर सोपवली होती. नितीन हिवसे हे आमच्या मिशन आय ए एस चे अध्यक्ष श्री अण्णासाहेब हिवसे यांच्या चिरंजीव. त्यांनी मला सोबत घेतले. आम्ही बडनेरा स्टेशनवर पोहोचलो. जसे बाळासाहेब रेल्वेतून खाली उतरले मी त्यांना माझे श्री संत गाडगेबाबा यांचे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. बाळासाहेबांनी ते पुस्तक कपाळाला लावले आणि मला म्हणाले श्री संत गाडगेबाबा हे माझे दैवत आहे.

त्यांचा माझा हा पहिलाच परिचय. आम्ही सोबत वरुडला गेलो. दिवसभर बाळासाहेबांबरोबर होतो. बाळासाहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या शेतकऱ्यांच्या हिताच्या होत्या. ते म्हणाले की आमच्या जिल्ह्यात आम्ही पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ देत नाही. आम्ही टेकड्यांवर वर्तुळाकार चर खोदलेले आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने जे नाले आहेत. ते पाणी वाया जाऊ नये म्हणून ठीक ठिकाणी छोटे बांध घालून ते पाणी अडवले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडूनही तिथे आर्थिक सुबत्ता आहे. त्याचा प्रत्यय काल मला हिवरे बाजार येथे श्री पोपटराव पवार यांना भेटल्यावर आला. आमच्या अमरावती पेक्षा एक तृतीयांश तिथे पडतो. पण त्या भागातील लोकांनी जे नियोजन केले आहे त्यामुळे तिथे उन्हाळ्यात देखील टेकडीवर देखील पाणी असते.

बाळासाहेबांचे श्री संत गाडगेबाबा यांच्यावर असलेले प्रेम मला माहीत असल्यामुळे मी त्यांना पुढच्या वेळेस ते जेव्हा अमरावतीला आले तेव्हा त्यांना म्हणालो आमचे श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर पथनाट्य ठिकठिकाणी सुरू आहे. ते म्हणाले मला पथनाट्य पाहायला आवडेल. मी आमच्या नाट्य टीमला फोन केला. त्यांनी सांगितले सध्या अमरावती महानगरपालिकेमध्ये प्रयोग सुरू आहे. बाळासाहेबांच्या नियोजनात हा कार्यक्रम नव्हता. पण बाळासाहेबांनी वेळेवर तो स्वीकारला आणि ते त्या नाट्य प्रयोगाला आले. कलाकारांना छान वाटले. त्यांनी नाट्यकर्मी श्री सारंग पणजकर व त्यांच्या सगळ्या नाट्य कलाकारांना शुभेच्छा दिल्या. काही काळ नाट्य वलोकन करून ते पुढच्या कार्यक्रमाला रवाना झाले.

मी बाळासाहेबांच्या अहमदनगर जिल्ह्यात मराठा सेवा संघाचे अधिवेशनाला गेलो होतो. बाळासाहेब उद्घाटनाला आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांना भेटलो. त्यांनी मला सोबत घेतले व विश्राम भवन गाठले. मला म्हणाले चला आपण माझ्या गावाला संगमनेरला जाऊ या. आम्ही गाडीत बसलो. आम्ही गाडी सुरू करणार तेवढ्यात नामदार श्री चंद्रकांत हंडोरे हे गाडी जवळ आले आणि बाळासाहेबांना म्हणाले मला तुमच्याशी बोलायचे आहे. बाळासाहेब म्हणाले तुम्हाला वेळ असेल तर चला संगमनेरला. मा.नामदार श्री चंद्रकांत हांडोरे यांनी होकार दिला. त्यांनी होकार दिल्या बरोबर मी गाडीतून उतरायला लागलो. आजच्यासारख्या अद्यावत गाड्या तेव्हा नव्हत्या. शिवाय रस्ते पण चांगले नव्हते. साधी ॲम्बेसिडर कार होती. मला उतरताना पाहून बाळासाहेब म्हणाले अहो काठोळे तुम्ही मागेच बसा. आपण तिघेही मागेच बसू. मला खूपच नवल वाटले. अहमदनगर ते संगमनेर हा प्रवास मी बाळासाहेब व चंद्रकांत हंडोरे यांनी कारच्या मागच्या सीटवर बसून केला.

बाळासाहेबांच्या साखर कारखान्याच्या अतिथीगृहात आम्ही थांबलो. बाळासाहेबांनी त्यांचा साखर कारखाना कागद कारखाना सर्व दाखवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये माझे वेळेवर कार्यक्रम आयोजित केले. त्यांनी लगेच संचालक मंडळाची सभा बोलावली. सर्वांना परिचय करून दिला. आम्ही जेव्हा जेवण करायला बसलो. तेव्हा आमच्या दोघांपुरतेच ताट समोर आले. बाळासाहेबांकडे मी प्रश्नार्थक नजरेने पाहिले. ते म्हणाले आमच्याकडे रोजच पाहुणे असतात. आम्ही सर्व संचालक जर पाहुण्यांबरोबर जेवण करीत बसलो तर साखर कारखाना अडचणीत येऊ शकतो. म्हणून आमच्याकडे येणारे पाहुणेच जेवतात. आम्ही कोणीच जेवत नाही.

मी माझा दोन दिवसाचा दौरा आतून संगमनेर वरून बाळासाहेबांचा निरोप घ्यायला लागलो तेव्हा बाळासाहेब खुर्ची वरून उठून दारापर्यंत मला सोडायला आले. चालकाला म्हणाले. साहेबांना अहमदनगर पर्यंत सोडून या.

बाळासाहेबांच्या संगमनेरला दोन दिवस असताना मला एक जाणवले की त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाची दाखल घेतल्या जाते. तो काळ संगणकाचा नव्हता. संगणक रुजू व्हायला वेळ होता. बाळासाहेबांकडे कोणीही मनुष्य आला तर त्याची रजिस्टर मध्ये रितसर नोंद होते. त्याचा पत्ता त्याचा फोन नंबर तसेच त्याच्या कामाचे स्वरूप काय आहे. त्यासाठी कोण्या साहेबांना फोन करावा लागेल. हे सगळे नमूद केल्या जाते.

बाळासाहेब जेव्हा दौऱ्यावरून परत येतात तेव्हा तो सर्व अहवाल पाहतात. संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना करतात. वेळ प्रसंगी फोन करतात. त्यांच्या कर्मचारी वर्ग इतका तत्पर आहे की त्यांच्या पातळीवर होणारे काम ते स्वतःच करतात. काम झाल्यानंतर त्या व्यक्तीला फोन जातो की तुमचे काम झालेले आहे. इतकी तत्पर व्यवस्था मी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मंत्र्याकडे पाहिली नाही. मी बाळासाहेबांना म्हटले तुम्ही एवढा तंतोतंत प्रत्येक माणसाच्या अहवाल पाहता ते म्हणाले. काठोळे लोक दुरून दुरून येतात. मी अनेक वेळा संगमनेरलाच नसतो. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीत सर्व कामाची नोंद होते. माझे अधिकारी त्यांच्या परीने जे काम होते ते करतात आणि ज्या कामासाठी मला फोन करावे लागतो त्याची मला जाणीव करून देतात. सर्वसामान्य माणसाची इतक्या तत्परतेने दखल घेणाऱ्या हा आगळावेगळा माणूस मला खऱ्या अर्थाने देव माणूस वाटला

एक वेळ बाळासाहेब अमरावतीला आले. सौ. वसुधाताई देशमुख तेव्हा मंत्री होत्या. त्यांनी चांदूरबाजारला श्री बाळासाहेब थोरात यांचा कार्यक्रम ठेवला होता. मी व काँग्रेसचे अध्यक्ष श्री चंद्रकांत ठाकरे बाळासाहेबांना घ्यायला बडनेरा रेल्वे स्टेशनवर गेलो. विश्राम भावनात आलो. बाळासाहेब तयार झाले. त्यांनी वसुधाताईंना फोन केला. वसुधाताईंना तयार व्हायला अर्ध्या तासाचा वेळ होता. बाळासाहेब मला म्हणाले काठोळे चला तुमच्या अकादमीमध्ये मी येतो. तोपर्यंत आपण मुलांशी चर्चा करू. एकदम ध्यानीमानी नसताना बाळासाहेबांनी माझ्या अमरावतीच्या आयएएस अकादमीमध्ये येण्याच्या मनोदय व्यक्त केला होता. मलाही नवल वाटले. बाळासाहेब आमच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीमध्ये आले. मुलांशी चर्चा केली. त्यांच्याबरोबर फोटो काढले. आणि आम्ही शहानुर प्रकल्पाकडे निघालो. बाळासाहेब मला म्हणाले काठोले तुम्ही मला काही मागितले नाही. मी मंत्री आहे. मी म्हटले साहेब आपण माझे पाहुणे आहात. मला मागणे योग्य वाटले नाही. त्यांनी लगेच त्यांच्या स्वीय सहाय्यकाला सांगितले. सरांना पन्नास हजाराची स्पर्धा परीक्षांची पुस्तके सप्रेम भेट म्हणून पाठवा. कुठल्याही प्रकारचे स्मरण न देता की पुस्तके घेऊन त्यांचा माणूस संगमनेर वरून येऊन अकादमीमध्ये देऊन गेला. त्या माणसाला आम्ही चहा पाण्यासाठी पाचशे रुपये केले. पण त्याने ते घेतले नाहीत. तो म्हणाला साहेब आमच्यावर तसेच संस्कार नाहीत. आम्ही आमचे काम केले. मला येथे जाण्या येण्यासाठी जेवणासाठी सर्व खर्च आमच्या संस्थेकडून करण्यात आलेला आहे. आम्ही खूप आग्रह केला पण त्या माणसाने ते पैसे स्वीकारले नाहीत. बाळासाहेबांनी आपल्या कर्मचाऱ्यावर देखील संस्कार केले आहेत. त्याचे एक मूर्तीमंत उदाहरण पहायला मिळाले.

माझे दोन मित्र आहेत. श्री ज्ञानेश्वर बोडके भंडारा व श्री बालपांडे नागपूर. त्यांना त्यांच्या सौभाग्यवतींच्या बदल्या करून पाहिजे होत्या. तत्कालीन आमदार श्री गाणार यांनी प्रयत्न केले. पण ते जमले नाही. मी त्यांना घेऊन बाळासाहेबांना भेटावयास मुंबईला सेवासदन या त्यांच्या मलबार हिल या निवासस्थानी गेलो. योगायोगाने त्यावेळेस सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्री बाबा आढाव हे पण आले होते. मी बाळासाहेबांना बदल्याविषयी सांगितले. त्यांनीच लगेच नागपूरच्या विभागीय आयुक्तांना फोन केला आणि दोन्ही बदल्या करण्यास सांगितले. हे काम फक्त दोन ते तीन मिनिटात झाले. जे काम गेल्या कित्येक महिन्यापासून रेंगाळले होते. ते काम बाळासाहेबांनी केवळ दोन ते तीन मिनिटांमध्ये करून टाकले होते.

आज बाळासाहेब सत्तेत नाहीत. पण सत्तेत नसतानाही बाळासाहेबांनी आपल्याच संस्कारामुळे महाराष्ट्रामध्ये स्वतः विषयी स्वतःच्या कार्याविषयी स्वतःच्या सामाजिक बांधिलकी विषयी जे वलय निर्माण केलेले आहे ते कालही होते आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. अशा या आदर्श व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा