प्रजासत्ताक दिनी बेमुदत आमरण उपोषण….
वेंगुर्ला :
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विविध कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. जो पर्यंत याबाबत जोपर्यंत ठोस कार्यवाही होणार नाही तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने २६ जानेवारी रोजी होणारे बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचे लेखी निवेदन वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे याना देण्यात आले आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून केलेल्या विकासकामांमध्ये तसेच विविध खरेदीमध्ये विद्यमान नगराध्यक्ष व तत्कालीन मुख्याधिकारी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. या भ्रष्टाचार विरोधात २६ जानेवारी २०२१ रोजी बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान वोटर एटीएम खरेदी प्रक्रिया, हरितपट्टा विकसित करणे, ४० एच पी विद्युत जनित्र खरेदी करणे, कंपोस्ट डेपो ठिकाणी बॉटल क्रश मशीन खरेदी करणे, न प फंडातील ४५ लाख रुपये वापरणे, कंपोस्ट डेपो ठिकाणी कारंजा उभारणे, याचठिकाणी नवीन गेट उभारणे, घंटागाडी सायकल पुरवठा, एफएसटीपी प्लांट उभारणे, जेसीबी खरेदी करून मंजूर डीपीआर, दरापेक्षा जादा रक्कम अदा करणे, न प हद्दीत वृक्ष गणना करून किमान ३ वर्षे संवर्धन करणे, हॉटेल संगीत रिसॉर्ट चे भंगार बिल अदा करणे, न प कार्यालयीन इमारतीत नव्याने बांधलेले संडास बाथरूम तोडणे, न प स्टोअर्स रूम निर्लेखीत करून स्क्रॅब साहित्य घेऊन जाणे व या कामात प्रत्यक्ष न प कर्मचाऱ्यांचा सहभाग असणे या सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या कामांची सखोल चौकशी होणे व संबंधितांवर कारवाई मागणी करण्यात आली आहे. तसेच याबाबतचे पुरावे कागदपत्र प्रत्यक्ष चौकशी दरम्यान सादर करू. चौकशी समितीने आम्हा सर्व उपोषणकर्त्यांना समाविष्ट करून चौकशी करावी जेणेकरून निष्पक्ष चौकशी होईल असेही निवेदनात म्हटले आहे.
तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनील दुबळे, महिला उपजिल्हाप्रमुख श्वेता हुले, शहरप्रमुख अजित राऊळ, तालुका महिला आघाडी प्रमुख सुकन्या नरसुले, महिला शहरप्रमुख मंजुषा आरोलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर, युवासेना प्रमुख पंकज शिरसाट, शहर समन्वयक विवेक आरोलकर, माजी नगराध्यक्ष संदेश, नगरसेविका सुमन निकम, नगरसेवक तुषार सापळे यांच्या सह्यांचे हे निवेदन मुख्याधिकारी याना देण्यात आले आहे.