You are currently viewing वसंतऋतू

वसंतऋतू

*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासिका लेखिका कवयित्री शब्दवैभवी पल्लवी उमरे लिखित अप्रतिम ललित लेख*

 

*🥀 वसंतऋतू*

 

शिषिर ऋतूतली पानगळ संपायलाआली की हळूहळू वसंताच्या आगमनाचे संकेत मिळू लागतात…हवेत शितल गारवा जाणवतो.. एखाद्या तपस्व्याप्रमाणे तटस्थ उभे असलेल्या पर्णगळीत वृक्षांवर ,लतावेलींवर कोवळी पोपटी पाने साज धरू लागतात..खरंतर ही पानगळच नव्या बदलांचे संकेत देते..!!जुनी कात टाकून नव्याचा स्विकार करण्याचे सांकेतिक बदल *वसंत ऋतू* देत असतो. फाल्गुन महिन्यात वसंताचे वारे वाहू लागतात… पानांची सळसळ ऐकू येते, आणि वाऱ्याच्या जराशा झुळकीने झाडावरची पिकलेली पाने गिरक्या घेत खाली येतात,झाडांच्या बुंध्याशी पिकलेल्या पानांचा खच साचतो…एखाद्या भग्न अवशेषाप्रमाणे झाडे भकास दिसू लागतात.असे असले तरी झाडाला पश्चात्ताप अजिबात होत नाही… कारण पानगळी नंतर नवी पालवी फुटणार असते. हेच तर निसर्गाचे चक्र आहे. निसर्ग नियमच आहे तो, इथुनच खऱ्या अर्थाने सुरू होतो सृजनाचा उत्सव… *वसंतोत्सव*…!!!

एकप्रकारे शिषिर ऋतू आपल्याला मनातली मरगळ बाहेर काढून नव्यानं स्वागत करण्याचा, नवनिर्मितीचा संदेश देत असतो.

हिरवा पोपटी पर्णसाज लेवून सृष्टी नाविन्याने पुन्हा सजू लागते.शुष्क उदासवान्या जीवनात इंद्रधनुषी रंग सजावेत तसे सृष्टीचे लावण्य बहरू लागते…लता वेलींचा कुसुमबहर सुखावतो…निशेच्या गर्भातून उमलू पाहाणाऱ्या गर्भरेषमी कळ्या उन्मादीत‌ होत उमलण्याच्या प्रतिक्षेत…

रात्रीचा गारवा, आसमंतात कमालीची धुंदी आणतो…!!

अनिलाच्या गारव्याने सुखावून लतावेलींचा फुललेला बहर…कुंदकळ्यांच चांदणं मनाला मोहीत करतं…रंगबिरंगी गुलाबाचे ताटवे पुष्पवाटीकेत सजू लागतात. हजारो रंगबिरंगी फुलपाखरे मधुप्राशन्यासाठी भिरभिरू लागतात…केवडा, रातराणी, चाफा जाईजुईंच्या मोहक सुगंधात अवघी अवनी सुस्नात होते..मोगरा ही धुंदीत येऊन फुलतो तेंव्हा टपोर चांदण्यांचे भास होतात…पारिजातकाचा सुगंधी दरवळ प्राचीच्या स्वागतास धवलकेशरी पायघड्या अंथरतो…चैत्रबनी रानपाखरांची शिळ जाते…आम्रतरू मोहरते, बहरते…

आंब्याचा मोहर सारी अमराई‌ सुगंधीत करुन जाते,कोकिळ पंचमसुरात मधुर गीत गुंजन करु लागते… आणि * वसंत ऋतू *आल्याची वर्दी देऊन जाते…कोकिळ गुंजन मनाला सुखावते….!!

गुलमोहरही पितकळ्यांचा साज लेवून अंगोपांगी मोहरतो…..हळूहळू केसरी कोंदण लेवून नखशिखांत बहरून सुखाच्या पायघड्याअंथरतो… .पलाशवृक्षही आपला देह भगव्या नारंगी रुपात अग्नीशिखेचं कोंदण लेवून बहरतो…इकडे उन्हाच्या तप्त झळा सुरू असतानाच हा मात्र अंगावर रक्तवर्णी साज लेवून मोहरतो….लालकेशरी रंगाच्या पायघड्या वाटसरूंसाठी अंथरण्यात गुलमोहराला धन्यता वाटते….एखाद्या सौंदर्यवती ललनेप्रमाणे सृष्टीलावण्य सजते , शाल्मली हिरवाईची नवलाई लेऊन दिमाखात , नखशिखांत सजलेली ,पलाशवृक्षही अंगोपांगी केशरी कोंदण लेवून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंचे लक्ष वेधून घेतो…..बहावा तर सोन पिवळा, हळदूला साज लेऊन नव्या नवरी सारखा पिवळाधम्म स्वर्णिम श्रृंगार करून भुरळच पाडतो तनामनाला ,इतकं त्याच देखणं रूप बघून गुलमाहरालाही हेवा वाटावा….अवघ्या अवनीला त्याच्या या रूपाची भुरळ पडते…जणू मेंदी भरल्या पावलावर रूणझुणते स्वर्णिम चाळ, इतके ते सोनपिवळे बहाव्याचे झुपके सुंदर दिसतात…जाई जुई,चमेली मोगऱ्याचा बहर आसमंत धूंद करुन वेडावतो….सृष्टीत नवचैतन्य संचारतं…धुंद मनाच्या प्रांगणात मंतरलेल्या वातावरणात मनपाखरु मनफांदीवर संथ झोके घेत असतं. होळीच्या रंगोत्सवात भिजायला… इंद्रधनुषी रंगाचे कोंदण लेवून…सृष्टीच हे लाजवंती रुप फक्त वसंतात बघायला मिळतं…नीलनिळ्या आकाशाच्या रंगमंचावर रान पाखरे घिरट्या घालीत,पंख फडफडवत वसंत ऋतूचे स्वागत करतात.हिरव्या पानांची सळसळ आणि ऋतू फुलांचा मोहक सुगंध ,गुलाबी प्रेमाचे मधुर तराणे गायला लावतो…प्रेमी जीवांना वसंत ऋतू म्हणजे मिलनोत्सव जणू…नेत्रपल्लवीतून नव्या प्रितीला धुमारे फुटतात,झंकारतात प्रिततारा रोमरोमी प्रितीला ह्रदय साद घालू लागते आणि वसंताचे साक्षिने प्रित अनामिक ओढीने मधुस्वप्नात हरवते,आणि गाऊ लागते प्रिततराणे…

गुलाबी प्रेमाचे, गुलाबी तराणे

तुझ्याच साठी ऋतूही दिवाणे

तुझ्या संगतीने सजावी निशाही

अशा सांज वेळी ऋतू हे फुलावे*

 

भुंगे फुलाभोवती घिरट्या घालीत गुंजन करीत गुणगुणत असतात… सृष्टीच्या अणुरेणूत मादकता भरलेली…जणू वसंतसेना मोहक पदन्यास करीत सृष्टीच्या रंगमंचावर फुलांच्या वर्षावात शृंगारून अवतरते…कुंजबनात बाकेबिहारी रासक्रिडेत मग्न, मथुरेत तर वसंतोत्सवाची धूम असते. अवघी मथुरा कृष्णरंगात रंगलेली… रंगांचा उत्सव सगळीकडे, जणू इंद्रधनुषी रंगात अवघे गोकुळ रंगलेले, झेंडूच्या फुलापानांची पिवळी आरास छान शोभून दिसते…अशातच रंगांचा उत्सव होळी येतो, आणि अवघ्या सृष्टीला रंगानी रंगवून जातो… जीवनाला नवी दिशा, नवचैतन्य देऊन जातो.

इथून सुरू होतो उत्सव शृंगाराचा,प्रेमाचा रती मदनाच्या मिलनाचा सोहळा..!! सृष्टीचे हे चक्र अव्याहत सुरू राहतं….

नवसृजनाचे स्वागत करण्यासाठी….!!

ऋतुराज वसंत सृष्टीत नवचैतन्य घेऊन येतो, नवी सकारात्मकता घेऊन येतो.. जणू नवजीवनाचा संदेश देतो अवघ्या सृष्टीला.

घेतो निसर्ग कवेत बाहू पसरवीत…. आनंदाचे ,मिलनाचे गीत गाण्यासाठी….!!

 

*मोहरला जीव,ऋतू वसंत फुलला मनात

बहरले हे आम्रतरु, शिळं गेली रानावनात*

फुटे‌ पालवी मनात, प्रेम ऋतू बहरतो

नवचैतन्यात सजून, ऋतू वसंत फुलतो

 

©®शब्दवैभवीपल्लवी उमरे

प्रतिक्रिया व्यक्त करा