*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी अरुण वी देशपांडे यांनी लेखिका आसावरी इंगळे यांच्या “कथा-कलश” चा केलेला पुस्तक-परिचय लेख*
——————-
आकर्षक कथांचा विविधरंगी “कथा कलश” – लेखिका आसावरी इंगळे
——————-
रसिक हो नमस्कार!
साहित्यिका आसावरी इंगळे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून आम्ही परिचित असल्यामुळे साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून संपर्कात आहोत.
‘रेणुका आर्ट्स’ या फेसबुक समूहाच्या संस्थापक आणि संचालक आहेत .साहित्य विषयक उपक्रमांचे आयोजन करून साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मोठे आणि महत्वाचे साहित्यिक कार्य त्या करीत आहेत. ‘रेणुका आर्ट्स आणि हे त्यांचे युट्युब चॅनेल सुरू आहेत.
‘ऑल इज वेल’ या पुस्तकानंतर त्यांचा पहिला कथा संग्रह ‘कथा कलश’ २०२४ मध्ये प्रकाशित झाला आहे. काही मोठ्या कथा, काही छोट्या कथा अशा
एकूण १४ कथांचा १८० पृष्ठांचा हा संग्रह ‘पलपब पब्लिकेशन्स,अहमदाबाद’ यांनी प्रकाशित केला आहे.
लेखिका आसावरी इंगळे मनोगतात स्वतःच्या कथा लेखनाबद्दल म्हणतात, “खूप क्लिष्ट भाषा , अवघड संवाद यापेक्षा सर्व सामान्य वाचकांना समजतील ते विषय आणि ती भाषा लिहिणं मला जास्त योग्य वाटतं. शेवटी लेखनातील भाव आणि मर्म वाचकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं. मानवी स्वभाव आणि नातेसंबंध प्रचंड गुंतागुंतीचा आणि बराचसा अनाकलनीय विषय आहे. ‘कथा कलश’ संग्रहातील प्रत्येक कथा नात्यांचे पदर उलगडून दाखवते. समाजाची एक संवेदनशील आणि जबाबदार घटक असल्याने समाजातील कांही महत्वाच्या मुद्द्यावर कथा सहजच गुंफत गेल्या आणि ‘कथा कलश’ तयार झाला. हा कथा संग्रह भाव-भावनांचं आंबटगोड मिश्रण आहे, अगदी नागपुरी संत्र्यांसारखं.”
मित्र हो, ‘कथा कलश’ संग्रह वाचून झाल्यावर वाचक देखील लेखिकेच्या मनोगताशी सहमत होतील. लेखिका आसावरी इंगळे यांच्या ‘कथा कलश’ मधील कथांच्या बद्दल वाचकाच्या भूमिकेतून या एकूणच कथांच्या बद्दल माझे निरीक्षण आणि मत व्यक्त करतो.
१. लेखिकेच्या या कथा-विश्वाचा अवकाश खूप मोठा असल्यामुळे ..या कथा लेखनात सविस्तरपणा मोठ्या प्रमाणात आहे. आटोपशीर ,नेमके लेखन हा निकष या कथांना लावता येणार नाही कारण तपशीलवार लेखनाच्या कथा, हे आसावरी इंगळे यांच्या कथा-लेखनाचे वैशिष्ट्य आहे असे मला वाटते.
२. व्यक्तिरेखा ,घडणारे प्रसंग , अकल्पित घटना यांची रेलचेल कथेतून वाचण्यास मिळते. हे सुसंगतपणे मांडण्याचे लेखन -कौशल्य लेखिकेला साधले आहे. अनेक वळणे घेत घेत पुढे सरकणारी कथा मूळ विषयाला कुठे सोडत नाही. यामुळे कथेच्या शेवटी परिणामकता साधता आली आहे.
३. आपण ज्या समाजात वावरत असतो, त्यात वावरतांना मनाला भावणारे, न भावणाऱ्या अनेक गोष्टी असतात. इष्ट -अनिष्ट चालीरीती, प्रथा आणि परंपरा, समजुती आणि अपसमज यांच्याबद्दल जन-सामन्यांच्या मनाचा विचार लेखिका सतत करीत असते आणि या चिंतनातून ‘कथा कलश’मधील कथा साकारून आल्या आहेत.
४. व्यक्ती मग पुरुष असो वा स्त्री यांच्यातील वृत्ती -प्रवृत्ती, भावनिक संघर्ष’ कथा कलश मधील कथांचे एक महत्वाचे सूत्र आहे, पैलू आहे ही जाणवते.
५. आजची आधुनिक जीवनशैली , नागरी आणि निमशहरी , ग्रामीण जीवनाचा आलेख यातील कथांमधून लेखिकेने उभारला आहे, यामुळे या कथा ‘विविध रंगी’ झाल्या आहेत. यातील सहज-स्वाभाविक वाटणार्या व्यक्तिरेखा अपरिचित ना वाटता कधी तरी कुठे तरी पाहिल्या आहेत, भेटल्या आहेत यासे वाटते.
६.सकारात्मकता हा गुण “जगण्याच्या लढाईत उपयुक्त शस्त्र आहे.”, हा संदेश या कथेतून मिळतो. यातील काही कथांचे उल्लेख करतो :
१. कथा – ‘वारस’ (पृ.०१) – ‘मुलगाच हवा’ या हव्यासापोटी राघो काय काय करतो त्याची ही कथा , यातील शालू , कामिनी , जुई या तीन स्त्रिया विरुद्ध राघो ..अशा व्यक्तीतील वृतीचा संघर्ष प्रभावीपणाने आला आहे.
२. कथा – औरस अनौरस (पृ. २६ ) – लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना नव्या पिढीला अपरिचित नाहीये . यावर आधारित ही कथा या समस्येचा
उहापोह करते.
शैलजा आणि तिची मुलगी.. त्यांची होणारी ससेहोलपट या कथेत आहे. शरद आणि शैलजा यांचे ही नाते कधीच समाजमान्य होणारे नाहीये, ही वस्तुस्थिती आणि त्याचे परिणाम भोगणारी शैलजाची मुलगी स्वरा, हा जो लढा उभारते त्याची ही कथा परिणामकारक झाली आहे.
३. कथा – मंगळसूत्र (पृ.७७ ) – स्त्री विवाहित आहे की अविवाहित ? हे तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे की नाही यावरून ठरवले जाते .मग हे
मंगळसूत्र गळ्यात असेल तर? आणि ते नसेल तर? त्या स्त्रीशी पुरुष कसे वागू पहातात हे वेगळे सांगायची गरज नाही.या कथेतील माधवी याचाच अनुभव घेत जगते आहे. तिचा बॉस असलेला शेखर तिच्याशी कसा वागतो ? त्याचे उत्तर देणारी ही कथा आहे.
याशिवाय दामिनी (पृ.४५ ), निर्धार (पृ..९६ ), लोक काय म्हणतील ? (पृ.११४ ),, रंग्या ( पृ.१४७ ), याही कथा उल्लेखनीय आहेत. हा कथासंग्रह अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
लेखिका आसावरी इंगळे यांच्या ‘कथा कलश’ संग्रहाचे वाचक छान स्वागत करतील, या सदिच्छा आणि लेखन शुभेच्छा !
——————————————
लेखन-स्नेही
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
कथा कलश {कथा संग्रह)
पृ.१८० , मूल्य- रु.२५० /-
ले- आसावरी इंगळे
96620 43611
—————————————–
प्रकाशक
पलपब पब्लिकेशन, अहमदाबाद (गुजरात )
—————————————–