You are currently viewing तो अन् ती…!

तो अन् ती…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तो अन् ती…!*

 

ती गरमागरम न्याहारी

त्यांच्या हातात देऊन

संध्याकाळी त्याची

वाट बघायची

त्याला येताना पाहून

बादलीभर गरम पाणी

ओट्यावर आणून ठेवायची

 

हातपाय धुवून तो

तिने बनवलेला मसालेदार

चहाची फुर्की मारायचा

थकल्या भागल्या अंगाला

ताजतवान करायचा

 

त्याने केलेल्या कष्टाचा थकवा

ती त्याच्या चेहऱ्यावर बघायची

भाकरी थापता थापता

दिवसभराच्या घडामोडी

ती आस्थेने विचारायची

तो ही तिला

खळ्यामळ्यातल्या घडामोडी

पोटतिडकीने सांगायचा

तिचा उत्साह तिचा आनंद

तिच्या चेहऱ्यावरचं हासू

तो डोळ्यात भरून घ्यायचा

 

चेहऱ्यावरचा आनंद पदराला बांधून

टराटरा फुगलेली गरमागरम भाकरी

भरभर ताटात टाकायची

किर्र अंधारात चांदण्यांच्या उजेडात

मांडीला मांडी लावून ती त्याच्या

संगतीने जेवायची

 

खूडा भाकरीच्या जेवणात ही

त्यांना लयी सुख वाटायचे

एकमेकांची काळजी घेताना

एकमेकांच सुख दुःख वाटून घ्यायचे

हिरवं हिरवं पिकं बहरलेलं शेत

ती त्याच्या बोलण्यातून बघायची

त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून

ओलावलेल्य मातीचा सुगंध

ती घरबसल्या घ्यायची

 

त्याच असं कष्टाचं जगणं

ती रोज बघायची

त्याच्या हातात गरमागरम

न्याहारी द्यायची

तोही तिने बनवलेली गरमागरम न्याहारी

डोक्यावर घेऊन शेतात जायचा

त्याच्या कष्टाच्या घामानं

सुकलेल्या मातीला जिवंत ठेवायचा.

 

संध्याकाळ झाली की

तो घराची वाट धरायचा

तिच्यासाठी दिवसभराच्या

घडामोडी सोबत घेऊन जायचा

ती ही पुन्हा पुन्हा घराबाहेर

डोकावुन बघायची

तो येण्याची वाट बघत,

संध्याकाळी त्यांच्यासाठी

ती ओट्यावर येऊन बसायची

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा