*नटसम्राटाची आयुष्याच्या रंगमंचावरून एक्झिट मनाला चटका लावणारी..*
प्रवीण मांजरेकर..पत्रकार उपसंपादक ते रंगभूमीवरचा नटसम्राट, हरहुन्नरी कलाकार, नाट्य दिग्दर्शक अशा चतुरस्त्र भूमिका निभावत असतानाच क्रिकेटच्या मैदानावरच कोसळून घेतलेली आयुष्याच्या रंगमंचावरील एक्झिट कित्येकांच्या मनाला चटका लावून गेली. सातोसे सारख्या छोट्याशा गावातून सावंतवाडी शहरात आलेल्या प्रवीण मांजरेकर यांनी मग मागे वळून पाहिले नाही. कॉलेज जीवनापासून सुरू केलेली पत्रकारिता पुढे त्यांचा ध्यास बनली अन् अखेरपर्यंत तरुण भारत संवादच्या या उपसंपादकाला मानसन्मान, प्रतिष्ठा देऊन गेली. हाडाचा पत्रकार म्हणून प्रवीण मांजरेकर यांचे नाव जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आदराने घेतले जायचे ते त्यांच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेमुळेच..! आज हाच गुणवान, मनमिळावू पत्रकार, द्रष्टा मित्र काळाच्या पडद्याआड गेला ही पत्रकारिता आणि रंगभूमी जगतासाठी दुर्दैवी घटना.
प्रवीण पत्रकार म्हणून उत्तम होताच पण झोकून देऊन काम करण्याची त्याची वृत्ती त्याला ग्रेट बनविते. नटसम्राटच्या भूमिकेत असो की अन्य कुठल्याही, रंगभूमीवरचा त्याचा वावर पाहिला की, त्याच्यातला खरा कलाकार आपल्या नजरेस पडतो. अनेक नाटकांचे दिग्दर्शक नाटकं बसवतात पण.., प्रवीण आपल्या कौशल्याने नाटक उभं करत होता, आणि त्यात जीव ओतून भूमिका करायचा. नटसम्राटची त्याची भूमिका अनेकांचे डोळे पाणावून सोडत होती. नाटक उभं करण्यासाठी जेव्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत असायचा तेव्हा स्वतःची नोकरी सांभाळून रात्र रात्र नाटकांची तालीम घेऊन नाटकात जिवंतपणा आणायचा ही त्याची ख्याती होती. नाट्य कलाकारांना योग्य प्रशिक्षण देऊन त्याने कितीतरी कलाकार घडविले आहेत. त्यामुळे अनेकांच्या हृदयात त्याला गुरूचे स्थान होते.
अस्मीच्या वक्तृत्व स्पर्धेतील वक्तृत्वामध्ये प्रवीणचे कौशल्य दिसायचे. तिच्या स्पर्धेतील सहभागमध्ये प्रवीणची मेहनत, कष्ट दिसून असायचे. त्यामुळे बापाच्या भूमिकेत देखील त्याने कोणतीही कुसुर ठेवली नव्हती. आपले काम, घर आणि छंद यांची योग्य सांगड घालत आयुष्याचा रंगमंच जिद्दीने उभा करणारा रंगकर्मी पत्रकार नाटकाच्या मध्यंतरातच रंगमंच पोरका करून गेला. पत्रकार, उपसंपादक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निवेदक अशा नानाविध भूमिकांमधून माणसांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास संवाद मिडिया कडून भावपूर्ण श्रद्धांजली…🙏