You are currently viewing द शो मस्ट गो ऑन

द शो मस्ट गो ऑन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*द शो मस्ट गो ऑन*

 *मालिका*

 

आज काल आपण बघतो, टीव्ही मालिकांना आणि वेब सिरीजना अगदी ऊत आला आहे. टीव्ही मालिका तर संपतच नाहीत, वर्षानुवर्षे चालतच राहतात. द शो मस्ट गो ऑन असे आपणच तर म्हणतो, मग ते खरेच आहे. एखाद्या कुटुंबाची न संपणारी कथा म्हणजेच टीव्ही मालिका, थोडक्यात जीवन – मालिका.

नानाविध प्रकारच्या व्यक्तींची गुंफण या मालिकेतील मुख्य पात्रांभोवती झालेली असते. माणसाचे जीवन तरी याहून वेगळे ते काय? यात घरातील नाती, त्या नात्यातून जोडली जाणारी काही बाहेरची नाती, त्याचप्रमाणे शाळा, कॉलेज, ऑफिस, व्यवसाय, छंद, यातून जोडले जाणारे संबंध!

आत्ताच्या या वैज्ञानिक युगात तर नुसते मोबाईलनेच आपण संपूर्ण जगाशी फार जवळचे नाते जोडले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आता बघा ना, मी इथे अमेरिकेत बसून हा लेख लिहिते आहे, एका क्लिकने तो या समूहावर पोहोचणार आणि महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतात आणि भारताबाहेरही तो वाचला जाणार. त्यावरचे अभिप्राय वाचताना त्या त्या व्यक्तींशी माझे एक मनाचे नाते तयार होणार. जशी माझ्या जीवन मालिकेची ही खूप छान जमेची बाजू आहे तशीच तुम्हा सर्वांचीही आहे.

“व्यक्ती तितक्या प्रकृती” असे आपण

म्हणतो. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती- सोबतच द्वेष करणारे, काही स्वार्थ-साधू, तर काही कपटनीतीने वागणारेही असतात. अनेकदा आपण अशा माणसांच्या वरवरच्या गोड बोलण्याला फसतो, त्यांच्या आहारी जातो आणि मग फार मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. मनाचे खच्चीकरण होते,

आत्मविश्वास ढासळतो व नैराश्य पदरी येऊन एकेकदा माणूस आयुष्यातून उठतो.

माणसाच्या स्वार्थी वृत्तीमुळेच महाभारत घडले, आणि कृष्णाला अर्जुनास

गीतोपदेश करावा लागला. कैकयीच्या हट्टा पायी रामाला वनवास घडला. रावणाच्या कपटा पायी आणि सीतेच्या हट्टा पायी प्रत्यक्ष श्री विष्णूंचा अवतार राम मायावी

कांचनमृगाची शिकार करण्यासाठी धावला.

मग आपल्या सामान्यांची काय कथा?

समर्थ रामदास स्वामींनी माणसाच्या मनाला उपदेश करताना सांगितले, ” धरी रे मना संगती सज्जनाची. ” ज्ञानेश्वरी, भागवत

या सर्वच ग्रंथांतून संत संगतीचे महात्म्य वर्णन केले आहे, परंतु या कलियुगात खरा संत कोण, सज्जन कोण हे ओळखणे फारच कठीण काम आहे. पेपर मध्ये आपण अशा किती भोंदू बाबांच्या कथा वाचतो. शिकली सवरलेली, गृहस्थी सांभाळणारी कितीतरी कुटुंबे काहीतरी आपत्ती आल्यामुळे किंवा मनातील एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी अथवा अन्य काही कारणांनी कोणाच्यातरी सांगण्यावरून, कुठेतरी वाचल्यावरून एखाद्या बाबाच्या नादी लागतात, त्यांनी दिलेल्या अंगार्‍या धुपार्‍यावर अंधविश्वास ठेवतात आणि अखेर आयुष्याची सर्व कमाई हरवून बसतात. मी अशी उदाहरणे अगदी जवळून पाहिली आहेत.

आमच्या घराजवळच एक सद्गृहस्थ राहत होते. ते सेवानिवृत्त झाल्यावर एकेठिकाणी दिवसभर बसायचे आणि त्यांच्या ओळखीतील काही बायकांना जन्मपत्रिका बघून काही बर्‍या वाईट गोष्टी सांगायचे. तेवढ्यावरून त्यांच्या नावाचा दूरवर गवगवा होत गेला आणि अखेर लोकांनीच त्यांना बाबा बनविले. त्यांनाही प्रसिद्धीची नि त्यातून मिळणार्‍या प्राप्तीची चटक लागली आणि अखेर व्हायचे तेच झाले.

त्यांच्याकडे अगदी नियमित येणारे आणि त्यांना लोटांगणे घालणारेच नंतर त्यांच्याविषयी अपशब्द काढू लागले.

स्वतःच्या घरात राहणे, स्वतःचे वाहन बाळगणे, ऊंची वस्त्र परिधान करणे, स्वतःचा एक स्टॅटस निर्माण करणे ही सर्वसाधारण सामान्याची आयुष्याची इतिकर्तव्यता असते. ही मानसिकता लक्षात घेऊनच आर्थिक गुंतवणुकीच्या अनेक योजना रोजच्या रोज येत असतात. त्यांनी दिलेल्या व्याजदराचा आणि दाखविलेल्या आमिषांचा माणसाला मोह होतो व या मोहापायी गुंतवणूक करून तो सर्वस्व गमावून बसतो.

आमचे आजोबा बॅंक ऑफ इंडियामधे

(त्यांच्यावेळी बॅंक नॅशनलाईझ्ड नव्हती) मोठे पदाधिकारी होते. ते आम्हाला नेहमी सांगत की कोणाच्याही बोलण्यावर पटकन् विश्वास ठेवायचा नाही, किंबहुना तो आपल्याला फसविण्यासाठीच आला आहे अशा भावनेतूनच त्याची उलटतपासणी घ्यायची, म्हणजे आपण सहजासहजी फसत नाही.

थोडक्यात काय? आयुष्यात येणार्‍या बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यासपूर्वक विचार करूनच पुढचे पाऊल टाकायचे. अत्यंत सावधानतेने चौफेर नजर रोखली पाहिजे. तेव्हाच ही मालिका सुखाच्या, आनंदाच्या वाटेने पुढे चालू राहील.

 

*अरुणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

प्रतिक्रिया व्यक्त करा