जिल्ह्याच्या इतिहासात प्रथम ११ हजार ८८१ घरकुले मंजूर – प्रभाकर सावंत
घर बांधकामासह अन्य संबंधित कामांसाठी रोजगार उपलब्ध होणार…
ओरोस
पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत जिल्ह्याच्या इतिहासात प्रथम ११ हजार ८८१ एवढी गरिबांसाठी घरकुले मंजूर झाली आहेत. एका आर्थिक वर्षात एवढ्या संख्येने प्रथमच घरकुले मंजूर झाल्याने या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून १७८ कोटी २१ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत. यातून घर बांधकामासह अन्य संबंधित कामांसाठी अनेक रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य संध्या तेरसे, कुडाळ महिला अध्यक्ष सुप्रिया वालावलकर, कार्यालय महामंत्री समर्थ राणे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री सावंत यांनी, पंतप्रधान मोदी यांचे तिसरे पर्व सुरू झाल्यावर पहिल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात गरीबांना घरे हा महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. त्याचे फलित आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसत आहे. अनेक वर्षे ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, एवढ्या वर्षात जेवढी घरकुले जिल्ह्यात मंजूर झाली नाही तेवढी घरकुले २०२४-२५ या एका वर्षात घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे गरिबांना घरे हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक योजने मागे एक तांत्रिक बाब असते. उद्देश असतो. तो उद्देश एकाचवेळी ११ हजार ८८१ घरे मंजूर झाल्याने स्पष्ट होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर उभारणी करण्यासाठी एक लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते. याशिवाय शौचालय उभारणीसाठी बारा हजार रुपये स्वच्छ्ता अभियान अंतर्गत दिले जातात. तसेच घराचा पाया खोदाईसाठी रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरी दिली जाते. अशाप्रकारे एकूण दीड लाख रुपये एवढे अनुदान घर उभारणीसाठी दिले जाते. त्यामुळे ११ हजार ८८१ घरे उभारताना चिरे, वाळू, गवंडी, सुतारकाम, प्लंबर, लाईट फिटींग, असे अनेक व्यवसाय उभे राहणार आहेत. तसेच ११ हजार ८८१ घरांसाठी दीड लाख रुपये प्रमाणे १७८ कोटी २१ लाख ५० हजार रुपये एवढा निधी खर्च होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याला जिल्हा नियोजन व्यतिरिक्त वेगळा निधी मिळणार आहे. याबाबत आपण पंतप्रधान मोदी यांचा धन्यवाद व्यक्त करतो, असे सांगितले.