शब्द हा कवितेचा आत्मा व भावना हा पाया
कोमसापच्या केंद्रीय मंडळाच्या अध्यक्षा कवयित्री नमिता कीर यांचे प्रतिपादन
निमंत्रित कवयित्रींचे १८ वे विभागीय संमेलन उत्साहात संपन्न
सावंतवाडी
महाराष्ट्राला चांगल्या कवयित्रींची परंपरा आहे. उत्तम कविता लिहिण्यासाठी इतर कवितांचे वाचन करावे. अन्य कवितांच्या अनुकरणाने आपली कविता समृद्ध होते. चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्यात कोणताच कमीपणा नसतो. वाचनातून, अनुकरणातून आपण समृद्ध होतो. शब्द हा कवितेचा आत्मा व भावना हा पाया आहे. समाजमाध्यमावर कवितांना मिळणाऱ्या प्रतिसादांनी हुरळून न जाता चांगल्या कविता वाचाव्यात, असे आवाहन कोमसापच्या केंद्रीय मंडळाच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी केले. सावंतवाडी येथील कवयित्री संमेलनात त्या बोलत होत्या.
दरम्यान,कधीतरी कवयित्री संमेलन आयोजित करणे सोपे आहे. परंतु, सातत्याने ते टिकवून ठेवणे अवघड आहे. सावंतवाडीतील या सातत्यपूर्ण संमेलनाकरिता आयोजकांचे फार कौतुक आहे, असे गौरवोद्गार देखील त्यांनी काढले.
चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी प्रकाशन संस्था व आरती मासिकाच्या प्रमुख आयोजनाखाली कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी व श्रीराम वाचन मंदिर यांच्या सहकार्याने आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडीच्या सभागृहात निमंत्रित कवयित्रींचे १८ वे विभागीय संमेलन कवयित्रींच्या उत्स्फूर्त उत्साहाने पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देण्यात आला. कोमसापच्या केंद्रीय मंडळाच्या अध्यक्षा नमिता कीर यांच्या हस्ते समई प्रज्वलनाने कवयित्री संमेलनाचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. उषा परब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
त्या म्हणाल्या की, कोविड कालावधी वगळता गेली १८ वर्षे हे कवयित्री संमेलन सातत्याने भरविले जात आहे. साहित्य व समाज या नाण्याच्या दोन बाजू असून साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे. गोवा व महाराष्ट्रातील कवयित्री या संमेलनात सहभागी होऊन आजवर संमेलनाची उंची वाढवत आल्या आहेत. प्रारंभी प्रा. उषा परब यांच्या हस्ते संमेलनाच्या अध्यक्षा हेमांगी नेरकर, प्रमुख अतिथी नमिता कीर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, चिंतामण साहित्य सहयोग सहकारी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, प्रा. सुभाष गोवेकर यांच्या हस्ते मान्यवर व निमंत्रित कवयित्रींचा सन्मान करण्यात आला.
या संमेलनासाठी व्यासपीठावर संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक हेमांगी नेरकर, डॉ. ईला माटे, गोव्यातील पत्रकार कविता आमोणकर, गोव्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. पौर्णिमा केरकर, कवयित्री रजनी रायकर व ज्येष्ठ लेखिका उषा परब उपस्थित होत्या.
संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून ज्येष्ठ साहित्यिक हेमांगी नेरकर यांनी सर्व कवितांचे रसग्रहण टिपले. त्यांनी त्यांचे वडील
चिं. त्र्यं. खानोलकर व श्री. उपाध्ये यांच्या आठवणींना उजाळा दिला. आरती मासिक सातत्याने काढणाऱ्या मंडळींचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी कवयित्रींना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, महिलांचे आयुष्य संघर्षमय असते. मुलगी विवाहबद्ध झाल्यावर तिला आयुष्यभर तडजोड करावी लागते. नवीन घरातील संस्कार, चालीरीती, जीवनशैली वेगळी असते. काही खटके उडाले किंवा कधी जुळवून घेता आले नाही, तरी मागे वळायला जागा नसते. लेखन करणाऱ्या महिला कवितेच्या माध्यमातून हे भावविश्व अचूक टिपतात. आज महिला शिक्षणामुळे समृद्ध झाली आहे. अनादी अनंत कालापासून सकस साहित्य निर्मिती करणाऱ्या कवयित्रींची आम्हाला परंपरा आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी आरती मासिक आयोजित सिंधुदुर्ग-गोवा मर्यादित काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. प्रथम उत्तेजनार्थ सर्वदा जोशी- गोवा, द्वितीय उत्तेजनार्थ सोनाली नाईक-रेडी, तृतीय- श्रृती हजारे, द्वितीय- आर्या बागवे व चित्रा क्षीरसागर, प्रथम क्रमांक मनिषा पाटील- कणकवली यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या कवयित्रींनी त्यांच्या बक्षीसपात्र कविता सादर करताच रसिकांची त्यांना उत्तम दाद मिळाली. या कवयित्री संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, ॲड. नकुल पार्सेकर, ॲड. प्रकाश परब, सुनील राऊळ, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, दीपक पटेकर, रामदास पारकर, प्रवीण परब, संजय लाड, सुहासिनी सडेकर, मंगल नाईक- जोशी, विनायक गांवस, सावंतवाडी इनरव्हील क्लबच्या सदस्या, आदी उपस्थित होते.
संमेलन आयोजन समितीतील प्रज्ञा मातोंडकर, श्वेतल परब, ऋतुजा सावंत भोसले, प्रतिभा चव्हाण, स्मिता परब यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.या कार्यकमाचे सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले. त्यानंतर कवयित्रींनी नावीन्यपूर्ण कविता सादर करून संमेलन उत्तरोत्तर बहारदार केले.
संमेलनाच्या सुरुवातीस सावंतवाडीतील उमलत्या दमातील निमंत्रित कवयित्री योगिता शेटकर यांनी जातिभेदावर प्रहार करणारी कविता सादर करून काव्यरसिकांना विचारप्रवण केले. गोव्यातील पत्रकार कविता आमोणकर यांनी सादर केलेल्या ‘काही सांगशील का’ व ‘निर्धार’ या कविता रसिकमनाचा ठाव घेऊन गेल्या. सर्वच कवितांना उत्तरोत्तर रसिकांची दाद मिळत गेली. बांदा येथील मीनाक्षी अळवणी यांनी ‘देव देव देव गाभाऱ्यात कोंडला
देव देव देव देव्हाऱ्यात मांडला..” या काव्यपंक्तीतून देवाची खरी ओळख विषद केली.
प्रा. मृण्मयी बांदेकर- पोकळे – यांच्या
” कशी कुणास ठावूक एकदा
वेगळीच गंमत घडली..
स्वर्गात एकदा तुकाराम आणि सॉक्रेटिसच्या पत्नीची भेट झाली ..” या कवितेने संमेलनास विनोदाची छटा दिली. उच्चपदस्थांच्या पत्नींचे जगण्यातील वास्तव त्यांनी विनोदातून साकारले.
गोव्यातील रजनी रायकर यांच्या ‘आलिंगन तुला पावसा’ या कवितेने सभागृह काल्पनिक पावसात चिंब भिजविले. “पाऊस हा माझा तुझा काळजातून बरसलेला..
मनाला रिझवणारा …चारी दिशांना फुललेला…! या कवितेबरोबर त्यांनी ‘कृष्णा’ कविता सादर केली.
डॉ. दर्शना कोलते यांनी नवरात्रीतील देवीच्या रूपांची स्त्री जीवनाशी सांगड घालणारी कविता
”मी तुझाच अंश माते
मनात माझ्या तुझेच रूजवण..” संमेलनास वेगळ्या उंचीवर घेऊन गेली.प्रा. शालिनी मोहोळ यांच्या “इंद्रिये अबोल होत जातात..” अशा काव्यपंक्तीच्या कवितेने रसिकांना विचारउद्युक्त केले. कल्पना मलये यांच्या
” ती हाताने स्पर्श करत राहते
महिना..दोन महिने.. नऊ दिवस.! हळूहळू तिच्या आश्वासक हाताने काढलेल्या वर्तुळाचा आकार वाढत जातो…!!” या ‘मातृत्व’ कवितेने क्षणभर मातेची ममता डोळ्यासमोरून तरळून गेली.
डॉ. प्रगती नाईक यांनी ” कधीतरी रिफ्रेश करावी लागतात नाती..गृहीत धरली तर उरतात फक्तवेदना आणि आठवणी.!”
या कवितेने नात्यांची गुंफण उलगडून दाखविली.
नात्याविषयीच्या या समर्पक शब्दांनी अलिकडच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकला.
गोव्याहून आलेल्या प्रा. पौर्णिमा केरकर यांनी ‘धावणारी माणसे’ या काव्यातून आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनाकडे लक्ष वेधले.
त्यांच्या दुसऱ्या
” ज्या गावात वड आणि पिंपळ
त्या गावाची भारी मला ओढ..” या कवितेने काव्यरसिकांना थेट निसर्गरम्य गावांत नेऊन सोडले.अनुराधा आचरेकर यांच्या मालवणीतील कवितेने कोकणवासीयांचे अलिकडच्या वर्षातील दुःख विनोदी थाटणीत मांडले. ” अवंदा कोकणातली भूता, लय झाली फेमस..” असे म्हणून त्यांनी मालिकांमधून मुळात नसणाऱ्या परंतु वारंवार दाखविल्या जाणाऱ्या कोकणातील अंधश्रध्दा, भुतेखेते, आदी गोष्टींबाबत निर्मात्यांना जख्खड दम भरला. या कवितेने सभागृहास खळखळून हसविले.
मध्यंतरीच्या वेळेत सावंतवाडी इनरव्हील क्लबच्या सामाजिक- सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन या संमेलनाअंतर्गत आयोजकांनी क्लबला सन्मानित केले. त्यानंतर कोल्हापूरहून आलेलेल्या डॉ. इला माटे यांनी सादर केलेल्या कवितांनी सभागृहास विचारप्रवण केले. त्यांची ” नव्या पिढीची मी स्पेसचा चौकोन आखते…” ही कविता सध्याच्या जीवनशैलीवर भाष्य करून गेली. पुढे ” खिडकीत वसलेलं आकाश
प्राक्तनच त्याचं गजानं विभागलेलं..” ही कविताही लक्षवेधी ठरली.
स्नेहा कदम यांच्या” उंच घरे बांधताना
खोदतच रहावे लागते
खोल – आत आत… ” अशा विलक्षण धाटणीच्या काव्यपंक्तींनी संमेलनात विशेष रंग भरला. मजबूत वास्तुसाठी आवश्यक असलेला भक्कम पाया यशस्वी जीवनासाठीही तितकाच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी काव्यातून समर्पकतेने मांडले.प्रा. नीलम यादव यांच्या
” कुठूनशी यावी वाऱ्याची झुळूक
अन् आभाळात आलेला काळा ढग अलगद निघून जावा..” या काव्यपंक्ती तितक्याच अलगदपणे रसिकांच्या मनात झिरपल्या. संमेलनात सादर झालेल्या सर्वच सकस कवितांनी काव्यरसिकां ना समारोपापपर्यंत खिळवून ठेवले. सावंतवाडीतील साहित्यिकमालेत या संमेलनाने सुंदर पुष्प गुंफले. कवयित्री संमेलनाचे सूत्रसंचालन प्रज्ञा मातोंडकर यांनी केले. प्रतिभा चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.