मुंबई :
डोंबिवलीच्या लोकसेवा समितीचा कोकण महोत्सव सध्या जोरात सुरू आहे. २४ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. मालवण तालुक्यातील आचरा गावचे श्री हरी विठ्ठल रखुमाई दिंडी भजन मंडळाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सादर करण्यात आलेल्या दिंडी भजनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
बक्षिसांचा वर्षाव झालेल्या या कार्यक्रमात वासुदेव, भक्त पुंडलिक, संत गोरा कुंभार, स्वामी समर्थ, शिवाजी महाराज, विठ्ठल रखुमाई, महामाया आदिशक्ती आदींचे दर्शन उपस्थितांना झाले. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने डोंबिवलीत भरत असलेल्या या महोत्सवात कोकणातील दशावतार, दिंडी, भजन कीर्तन, गोफ, फुगडी, नमन आदी कार्यक्रम पाहण्याचे भाग्य डोंबिवलीकराना मिळते. लोकसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम नाटेकर, भरत सुर्वे, विष्णू सकपाळ आणि विद्यमान अध्यक्ष रामचंद्र परब, सचिव चारुदत्त राणे यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा महोत्सव सुरू आहे.भाजपा उपाध्यक्ष हरीश जावकर, भाई पानवडीकर, कैलास सणस, तसेच बुवा लवू घाडी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास डोंबिवलीकरानी तुडुंब गर्दी केली होती.