मानसिक समुपदेशन काळाची गरज- निखिल कानेकर
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिक समुपदेशन मार्गदर्शन कार्यक्रम स्थानिक समिती अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री निखिल कानेकर, समुपदेशक ग्रामीण रुग्णालय वैभववाडी यांनी आपल्या समुपदेशनामध्ये पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये होणारा संवाद आणि आत्ताच्या एकल कुटुंबात संवाद हरवलेला दिसतो. मानसिक संतुलन बिघडते म्हणजेच नैराश्य येते. अशावेळी एकत्रित कुटुंबामध्ये एकमेकांशी हितगुज, चर्चा होत होती. आज देखील महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळी व शिक्षकांबरोबर तणाव कमी करण्यासाठी मन मोकळे केले पाहिजे. याबरोबरच त्यांनी मानसिक आरोग्य संदर्भातील पुस्तकांचे उपस्थित विद्यार्थ्यांना वाटप केले. तसेच आरोग्य मित्र श्री. तन्मय सावंत यांनी आरोग्याच्या योजनेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
श्री.सज्जनकाका रावराणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात चांगल्या मित्रांची संगत व निर्व्यसनी राहण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी 50 वर्षावरील स्त्री-पुरुषांना शासकीय आरोग्याच्या योजनांबाबत माहिती दिल्यास त्याचा सर्वांना लाभ मिळेल. या वेळी व्यासपीठावर प्र.प्राचार्य डॉ.एन व्ही गवळी, उपप्राचार्य डॉ. एम.आय.कुंभार, मानसशास्त्र विभागाचे डॉ. आर. एम. गुलदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.गुलदे यांनी केले तर आभार प्रा.एस.आर.राजे-कांबळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.