अमरावती :
परवा अमरावतीला पद्मश्री डॉ. प्रकाशबाबा आमटे आले होते. पद्मश्री श्री प्रकाश बाबा आमटे यांच्या व्याहयांकडे आम्ही अमरावतीच्या छत्रीतलाव रोडवरील शिवनगर भागात बसलो होतो.त्यांच्या व्याहयांकडे आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो. या छोटेखानी बैठकीत आमचे युवा मित्र व प्रश्नचिन्ह शाळेचे सर्वेसर्वा श्री मतीन भोसले यांनी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे प्रश्नचिन्ह ह्या आश्रम शाळेत बाल साहित्य संमेलन घेण्याचा विचार बोलून दाखविला. सर्वांनी त्यांना मान्यता दिली.मतीन कामाला लागला. साहित्यिकांच्या व इतर मान्यवरांच्या भेटीसाठी घेऊ लागला आणि आता या संमेलनाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.
येत्या गुरुवार व शुक्रवार दिनांक २३ व २४ जानेवारी २०२५ रोजी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह या आदिवासी शाळेमध्ये यावर्षीचे बाल साहित्य संमेलन होत आहे. प्रश्नचिन्हचे सर्वेसर्वा श्री मतीन भोसले यांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे. मतीन हा तसा धडपडणारा ४२५ आदिवासी फासेपारधी मुलांचे तो संगोपन त्यांचे राहणे जेवणे शिक्षण हे सर्व तो करतो. हे संमेलन आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आभारच मानले पाहिजेत. साने गुरुजींनी म्हटले आहे करेल रंजन जो मुलांचे: जडेल नाते प्रभूशी तयाचे ! लहान मुलांमध्ये असलेल्या साहित्यिक गुणांना वाव देण्यासाठी या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कोवळ्या कळ्यामाजी : लपले रवींद्र शिवाजी ! असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे आणि ते खरेच आहे. लहानपणी जर सुयोग संस्कार झाले तर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल होऊ शकतो आणि म्हणून बालपणातच त्यांच्या बालमनावर योग्य ते खतपाणी देण्याची नितांत गरज आहे. च्या मोबाईलच्या टीव्हीच्या जमान्यात तर ते आवश्यकच आहे.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते. आणि ते खरेच आहे. आजकाल मुलांचे बालपण हरवत चाललेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारच्या बाल साहित्य संमेलन अशा उपक्रमाची गरज असते. दिल्लीला यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. पुण्याला जागतिक मराठी साहित्य संमेलन होत आहे. पण या साहित्य संमेलनामध्ये बाल साहित्याचा विचार होईलच असे ठामपणे म्हणता येत नाही. किंवा या दोन्ही साहित्य संमेलनाला मर्यादा पडतात. मी मागे साहित्य संमेलनाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे असा मुद्दा मांडला होता. जागतिक किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सर्व महाराष्ट्रातील आणि भारतातील मराठी बोलणाऱ्या लोकांचा विचार होणे अशक्यच गोष्ट आहे. ते एक प्रतिनिधिक साहित्य संमेलन आहे. मग वेगवेगळ्या भागातील लोकांनी एकत्र येऊन त्या त्या भागातील लोकांचे साहित्यिकांचे संमेलन घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे विदर्भ साहित्य संघ मराठवाड्यामध्ये मराठवाडा साहित्य परिषद अशा संस्थांनी नियमितपणे आपली प्रादेशिक साहित्य संमेलने भरवली आहेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे होणारे बाल साहित्य संमेलन हे या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
दिनांक २३ व २४ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये सुप्रसिद्ध सेने कलावंत व सामाजिक जाणीव असलेले अभिनेते श्री मकरंद अनासपुरे यांची विशेष उपस्थिती आहे. याशिवाय इतर अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. उद्घाटन कथाकथन, कवी संमेलन, परिसंवाद असे भरगच्च कार्यक्रम या बाल साहित्य संमेलनामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत.
खरं म्हणजे अशी साहित्य संमेलने जिल्हा जिल्ह्यात झाली पाहिजेत. मतीन भोसले नावाचा कार्यकर्ता हा प्रश्नचिन्ह शाळेच्या माध्यमातून फासेपारधी मुलांचे शिक्षण संगोपन व संवर्धन करीत आहे. त्याने पुढाकार घेऊन या संमेलनाचे आयोजन केलेले आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व तत्पर तेजस्वी व तपस्वी तसेच अष्टपैलू होण्यासाठी अशा प्रकारची साहित्य संमेलने खूप उपयोगी पडतात. विद्यार्थ्यांच्या ठिकाणी असलेल्या कलागुणांना अशा प्रकारच्या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनामध्ये वाव मिळतो. पालकांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांना पाल्यांना वेळोवेळी अशा प्रकारच्या उपक्रमासाठी प्रोत्साहित केले पाहिजे व या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर आपणही सहभागी झाले पाहिजे.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील आदिवासी आश्रम शाळेत होणारे हे साहित्य संमेलन निश्चितच नवी दिशा दाखवणारे ठरेल या शंका नाही.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003