कणकवली / तळेरे :
तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथे सिंधुदुर्ग भारत स्काऊट्स आणि गाईड जिल्हा संस्था आणि शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या स्काऊट गाईड जिल्हा मेळावा २०२४ – २५ मध्ये आज दुसऱ्या दिवशी तळेरे बाजारपेठेमध्ये काढलेल्या शोभायात्रेने खूपच रंगत आणली. या शोभायात्रेचे उद्घाटन विद्यालयाचे अध्यक्ष अरविंद महाडिक, दादा महाडिक, स्काऊट गाईडच्या माजी जिल्हाचिटणीस स्नेहलता राणे, प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या उपस्थितीत झाले.
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय,तळेरे येथून सुरू झालेल्या या शोभायात्रेमध्ये तब्बल ४५ स्काऊट,गाईड तसेच कब,बुलबुल पथकांनी भाग घेतला. साधारणपणे ८०० विद्यार्थी व १०० शिक्षक सहभागी होते.
या दिमाखदार सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध परंपरांचे व संस्कृतीचे प्रदर्शन तळेरे वासियांना घडविण्यात आले.
यामध्ये दशावतार, वारकरी संप्रदाय, दिंडी-भजन, शिवछत्रपतींचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, धनगर नृत्य, आदिवासी नृत्य, गोंधळ नृत्य, आदिवासी नृत्य, शेतकरी नृत्य इत्यादी प्रकार सादर करण्यात आले. या सर्वांमध्ये विठ्ठल – रखुमाई व वारकरी संप्रदायातील संतांचा चित्ररथ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
ही शोभायात्रा तळेरे बस स्थानकासमोरील चौकामध्ये रिक्षा संघटनेच्या व्यासपीठावरती या सर्व पथकांनी आपली कला सादर केली. त्यावेळी शेकडो तळेरे वासियांनी या कलांचा आस्वाद घेतला. त्यानंतर ही शोभायात्रा तरळे बाजारपेठेमध्ये जाऊन त्यानंतर पुनश्च वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयांमध्ये परतली.