*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित रचनेचे डॉ.ऐश्वर्या डगावकर यांनी केलेले रसग्रहण…….*
*सुख ऐश्वर्य*
************
तव कृपाळू कटाक्षात
तृप्तीचाच महासागर
मी त्यात नित्य डुंबतो
कृतार्थ होतो अलवार
श्वासावर तुझीच सत्ता
मी तुझाच भक्त पामर
तू असता काय असावे
तुझ्यात रे शांती सरोवर
सुखऐश्वर्य सारे बेगडी
मी भजतो तुज निरंतर
दंगता तव नामस्मरणी
लोचनी मुक्तीचा सागर
*******************
सुंदर ‘ त्याची ‘ कृपादृष्टी आपल्यावर असेल तर संसारात कशाचीच कमी नाही.हा झाला ऐहिक अर्थ पण गर्भितार्थ लक्षात घेता त्याची कृपा म्हणजे त्याच्यात आपण सामावून जाणे अथवा ‘त्याचीच ‘गोडी लागते.मन तृप्त होते आणि ‘ त्याच्या भक्तीत लीन होणे किंवा रंगून जाते आणि त्या भक्ती रसात डुंबल्यावर मनुष्य धन्य होतो.सर्वांविषयी , ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी काही केले असेल त्यांच्यासाठी कृतज्ञतेचा भाव मनात निर्माण होत जातो.अखेर ही कृतज्ञताच त्याच्याविषयी कृतार्थ भाव व्यक्त करण्यात यशस्वी होते.
मग जाणवतं ते आपलं काहीच नाही.आपल्या प्रत्येक श्वासावर त्याचीच मालकी आहे.कारण त्याची कृपा आहे तोपर्यंत आपण आहोत अखेर जन्म मरण त्याच्याच हातात.आपण सर्व तर त्याचे भक्त त्याचीच प्रजा आपल्या हातात काय आहे .मी पामर म्हणजे दुर्बळ, अशक्त मी काय अहंकार करणार सर्व काही ‘ त्याचेच’ आहे आपण कोणीच नाही .त्या चरणाशीच सर्व सुखशांती आहे.हा समर्पण भाव जागृत होऊन मनुष्य लीन होतो
मग त्याला भौतिक जगात ऐहिक सुखात रस वाटत नाही
सर्वा काही बेगडी वाटू लागतं
आणि तो त्याच्या भजनात नामस्मरणात ,पूजनात दंगून जातो, रंगून जातो आणि मग सर्वांपासून मुक्त होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा जणू सागरच
वाहू लागतो .हे अश्रू साधेसुधे नसून जीवनाच्या इतिश्री चे असतात.मोहमायेपासून मुक्तीचे असतात आणि मनात फक्त ‘त्या ‘च्यासाठी कृतार्थ भाव असतात.सर्व काही तोच आहे आपण कुणी नाही याची जाणीव असते.फक्त सुखदु:खच नव्हे तर आपला श्वास देखील त्याच्या हातात आहे .मी पणा ,अहंभाव मिटल्या चे ते अश्रू असतात.
वि.ग.सा .च्या अध्यात्मिक कविता या नेहमीच ‘ ईश्वराला ‘समर्पित असतात.त्यांची अध्यात्मिक उंची आपल्याला जाणवते.प्रत्येक कवितेतून ते आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ईश्वराची महती जाणवून देतात.राग लोभादि षड्रिपूंना त्यागून ईश्वराच्या चरणाशी लीन व्हा हे सांगत असतात.त्यांच्या कविता वाचतांना भगवद्गीता त्यांनी आत्मसात केली आहे हे आपल्याला जाणवतं.
सौ ऐश्वर्या डगांवकर.पुणे.