You are currently viewing चांदेर आणि तळाणीवाडी मसुरे तलाठी सजाला जोडण्यात यावी

चांदेर आणि तळाणीवाडी मसुरे तलाठी सजाला जोडण्यात यावी

मसुरे- चांदेरचे सुपुत्र डॉ. दीपक परब यांची मागणी

मालवण

मालवण तालुक्यातील चांदेर आणि तळाणीवाडी ही दोन महसुली गावे आंगणेवाडी येथील तलाठी कार्यालयाकडे समाविष्ट आहेत. काही वेळा आंगणेवाडी गावचे तलाठी हे कार्यालयात अनुपस्थित असल्यास चांदेर, तळाणीवाडी गावच्या लोकांची गैरसोय होतेच शिवाय लोकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ग्रामस्थांच्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आंगणेवाडी तलाठी सजाला जोडलेली ही दोन्ही गावे मसुरे तलाठी सजाला जोडण्यात यावी अशी आग्रही मागणी चांदेर गावचे सुपुत्र आणि उद्योजक डॉ. दिपक परब यांनी केली आहे.
पंचवीस तीस वर्षापूर्वी मालवण तालुक्यातील मसुरे गावातील चांदेर आणि तळाणीवाडी ही दोन महसुली गावे आंगणेवाडी तलाठी कार्यालयाला जोडण्यात आली. मसुरे गावचे विभाजन होऊन बिळवस आंगणेवाडी ही गावे वेगळी झाली आहेत. तर चांदेर, तळाणीवाडी ही महसुली गावे मर्डे ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट झाली आहेत. तसेच येथील ग्रामस्थांना मसुरे तलाठी कार्यालयात येणे सोपे होणार असल्याने ही गावे मसुरे तलाठी कार्यालयास जोडणे सोईचे ठरणार आहे. आंगणेवाडी गावा लगतच चांदेर आणि तळाणीवाडी ही गावे असली तरी या दोन्ही गावातील लोकांना आंगणेवाडी मध्ये यायचे असल्यास जवळचा मार्ग म्हणून जंगलमय भागातून यावे लागते. होणारा वेळेचा अपव्यय लक्षात घेता चांदेर, तळाणीवाडीतील ग्रामस्थांना मसुरे गाव हा जवळचा आणि सोयीचा वाटत असल्याने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांदेर- तळाणीवाडी ही दोन्हीं गावे मसुरे तलाठी कार्यालयाला जोडण्यात यावी व ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी डॉ. दिपक परब यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा