You are currently viewing आपल्या कविता इंग्रजीतून यायला हव्यात;  ज्येष्ठ कवी संजय बोरुडे यांचे प्रतिपादन

आपल्या कविता इंग्रजीतून यायला हव्यात;  ज्येष्ठ कवी संजय बोरुडे यांचे प्रतिपादन

साहित्यलेणी प्रतिष्ठानतर्फे प्रसिध्द कवी डॉ. संजय बोरुडे यांच्या समवेत उपस्थित कवी

पणजी :

अहमदनगर (अहिल्यानगर) येथील ज्येष्ठ कवी डॉ. संजय बोरुडे यांच्यासमवेत साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम ताळगाव येथील साहित्यलेणी प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ कवयित्री दया मित्रगोत्री यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाबपुष्पे देऊन डॉ. बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला.

विविध भाषांतील कविता मराठी भाषेत रुपांतरित करण्याचा अनुभव त्यांनी कथन केला. हिंदी आणि इंग्रजीमधून व त्या भाषांतील कविता मराठीत आणण्याचा अनुभव सुखद होता असे ते म्हणाले. आपली कविता सर्वदूर पोहोचायची असेल तर ती इंग्रजीत यायला हवी असे ते म्हणाले.

यावेळी उमेश शिरगुप्पे, दया मित्रगोत्री, मंजिरी वाटवे, चित्रा क्षीरसागर व प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी आपल्या कविता सादर केल्या.

तो तसा

लहानपणापासूनच

झाडवेडा होता

झाडांना पाणी घालता घालता

स्वतःच वाढत होता

या कवितेतून निसर्ग आणि मानव कसे एक दुसऱ्याला जपतात आणि एकरूप होतात, असे बोरुडे म्हणाले.

एक चूक झाली अन् मडके गेले फुटून

झिम्मा टाकून अर्ध्यावरती पोरी आल्या उठून

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू

हातातल्या काकणाला किती वेळा भुलू

फेर धरता पंचमीचा सूर गेला चुकून

झिम्मा टाकून अर्ध्यावरती पोरी आल्या उठून

या कवितेतून त्यांनी पोरींची अवस्था आणि भावविश्व उभे केले.

तर

देह झाला पंढरपूर

डोळ्याला चंद्रभागा

तुकयाच्या अभंगाला देईना विठू जागा

ही आगळीवेगळी कविता सादर करून त्यांनी भक्ताची व्यथा सांगितली.

माती आणि पावसाची व्यथा फक्त शेतकरी समजतो. अहिल्यानगर, मराठवाड्यात, तसेच सोलापूर आदी भागातील पावसाचे व पाण्याचे दुर्भिक्ष्य हेच विषय तेथील कवितांतून येणार तिथे समृध्दीच नाही तर हे विषय तेथील साहित्यिक कसे लिहू शकणार, असेही बोरूडे म्हणाले.

यावेळी संजय बोरुडे यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्पे देऊन सन्मान करण्यात आला.

दुःख तळव्यावर तंबाखूसारखे ठेवून त्याला अंगठ्याने चुना लावावा, आणि अलगत चिमटीत धरून तो दाढेखाली ठेवावा, या आशयाची कविता दया मित्रगोत्री यांनी सादर केली. दुःख काही बायांनाच नसतं तर पुरुष असण्याचंही काय दुःख असतं हे प्रकाश क्षीरसागर यांनी कवितेतून मांडलं. चित्रा क्षीरसागर यांच्या आताशा पोरी या कवितेनं पोरींतील बदलत्या विश्वाचे दर्शन घडविले. मंजिरी वाटवे यांनी आपला जीवनपटच कवितेतून मांडला. वाटवे यांनीच आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा