*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*स्वप्न*
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार कपिल देव याने पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप जिंकून भारतात आणल्यानंतर यावर्षी पुन्हा कर्णधार रोहित शर्माच्या टीमने पाकिस्तान विरुद्धच t20 वर्ल्ड कप जिंकून आणला. प्रत्येक खेळाडूचे उच्चतम बक्षीस जिंकायचे, आधीच्या टीम मधील खेळाडूने केलेले रेकॉर्ड्स मोडायचे असे स्वप्न असतेच. अशी स्वप्ने पाहतच तो मोठा होत जातो.
ISRO ने मंगलयान-१ मिशन २४ सप्टेंबर २०२३ रोजी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर आता मंगलयान- २ मिशनची जयत तयारी चालू आहे. याचाच अर्थ असा की, एक स्वप्न पूर्ण झाल्यानंतर दुसरे स्वप्न पाहणे चालूच असते. किंबहुना माणसाचा हा स्वभावच आहे की त्याचे एकाने समाधान होत नाही. तो लगेच दुसरे स्वप्न पाहू लागतो.
ही झाली राष्ट्रीय पातळीवरची उदाहरणे.
संसाराच्या या सारीपटावर प्रत्येकाचीच अशी काही ना काही स्वप्ने असतात. वैयक्तिक आयुष्यातही तुम्ही, मी, आपण सर्वच सुंदर स्वप्ने पाहतो, त्यात रममाण होतो आणि त्याचा आनंद घेतो.
शाळेत जाणारा विद्यार्थी म्हणेल, ” या परीक्षेत माझा नंबर दुसरा आला, पुढच्या परीक्षेत मी पहिला क्रमांक पटकावेन.” ८० टक्के मार्क मिळाले तर त्याचा पुढचा प्रयत्न असेल ९० टक्के काढण्याचा.
नवविवाहित जोडपे सुरुवातीला दोन खणी जागेत त्यांचा संसार मांडेल, पण त्यांच्या स्वप्नातील घर वेगळेच असेल. ती नवविवाहिता म्हणत असेल, *असावे घरटे अपुले छान*
*पुढे असावा बाग बगीचा*
*वेलमंडपी जाई जुईचा*
*आम्र तरुवर मधुमासाचा*
*फुलावा मोहर पानोपान*ं
सरकारी कचेरीतील एखाद्या कारकुनाने डेप्युटी नाहीतर जॉइंट सेक्रेटरी होण्याची स्वप्ने बघितली तर त्यात वाईट काय आहे?
माझा मुलगा खूप शिकून मोठा ऑफिसर होईल, त्याला समाजात भरपूर मानमरातब मिळेल, हे तर प्रत्येकच आईचे स्वप्न असते नाही का? मुलाच्या सत्काराला जेव्हा ती जाते तेव्हा तिचा ऊर अभिमानाने भरून आलेला असतो, तिच्या अंगावर मुठभर मांस चढलेले दिसते.
तर थोडक्यात काय? लाईफ इज अ ड्रीम.
मी सुधीर फडके यांचे गीत रामायण जेव्हा प्रथम ऐकले, त्या क्षणी माझ्या मनात विचार आला होता की यातील एक तरी गीत मला कधी गाता येईल का? “छे ! काय हे भलतेच स्वप्न पाहते मी? मला कुठे गाता येते?” पण काय सांगू? या गोष्टी नंतर कित्येक वर्षांनी मला गाणे शिकण्याचा योग आला आणि माझ्याकडून एखादे गाणे सोडा, संपूर्ण ५६ गाण्यांचे गीत रामायण आमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात भाविक भक्तजनांपुढे गायले गेले. सहज पाहिलेले हे स्वप्न कसे साकार झाले?
तेव्हा स्वप्ने जरूर पहावी, पण हो! पाहिलेली स्वप्ने पूर्ण करताना इतरांना दुखावले जाणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मला मोठ्या, हवेशीर, चांगल्या वस्तीत असलेल्या घरात राहायचे आहे म्हणून एखाद्याच्या घरात कुलूप तोडून घुसखोरी करणे
हा अक्षम्य गुन्हा आहे. माझ्या सहकाऱ्याची वरिष्ठाकडे तो कसा कामचुकार आहे, भ्रष्ट आहे वगैरे खोट्या तक्रारी करून त्याला मिळणारे प्रमोशन स्वतःकडे खेचून आपले स्वप्न पुरे करणे हे केव्हाही वाईट कृत्य आहे. प्रत्येकच क्षेत्रात आपण सहकार्यापेक्षा एकमेकांचे पाय खेचणे कसे चालू आहे ते पाहतोच आहोत.
एक चांगली सुसंस्कृत व्यक्ती म्हणून समाजात मानाने जगायचे असेल, आणि चांगला समाज निर्माण करायचा असेल, तर प्रत्येकाने असाच संकल्प केला पाहिजे की जीवनातील माझी स्वप्ने पूर्ण करताना दुसऱ्याची ही स्वप्ने उधळली जाणार नाहीत याची मी पूर्ण काळजी घेईन. म्हणजे आयुष्याच्या अविरत चालू असलेल्या या खेळात आपल्या पुढच्या पिढीवरसुद्धा हेच संस्कार होतील.
अरुणा मुल्हेरकर
मिशिगन