*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*स्त्री बंधन …*
सात/आठ वर्षांपूर्वी मी वैदिक नावाचे पुस्तक
वाचले होते नि ते वाचून प्रचंड हादरले होते. कारण त्या काळातील स्त्रियांची स्थिती. संस्कृती निर्माण होण्याचा तो काळ होता. माणूस तेव्हा माणूसच नव्हता तर नरराक्षस होता. तिकडे उत्तरेत हिमालयाच्या पायथ्याशी
ऋषीमुनिंचे आश्रम होते. जमदग्नी विश्वामित्र
वसिष्ठ व त्यांच्या भार्या आश्रमात वेदविद्या
शिकवण्याचे व त्यांच्या प्रसाराचे काम करत होते. इकडे रेवा तीरी मात्र नर्मदा मैयेच्या आजूबाजूला भयंकर परिस्थिती होती.
अंतरे फार होती. साधने फक्त पाय, घोडा व रथ.
रथ फक्त राजे वापरत असत. जमदग्नी ऋषींनी
पुत्र परशुराम व पत्नी रेणुकेला संस्कृती प्रसारा
साठी रेवा तीरी पाठवायचा निर्णय घेतला कारण
तिथल्या नरपशूला त्यांना माणसात आणायचे होते. उत्तरेतून प्रवासही इतका सोपा नव्हता म्हणून काही अंतर रथाने कापले व परशुराम व रेणुका रेवा तीरी आले. ती हकिकत फारच भयंकर आहे. कारण टोळी युद्ध्ये व स्त्रियांची
स्थिती फारच भयंकर होती. भयंकर कत्तल व नरसंहार तर होताच पण स्त्रियांना भोगून मारून,
प्रसंगी खाऊन टाकत असत इतकी माणसे भयंकर होती. फारच भयावह अवस्था त्या काळातही स्त्रियांची होती. परशुराम व रेणुकाने
महत्प्रयासाने या नरपशुंना माणसात आणले व
त्यांना शेती कसायला शिकविले.
एकीकडे अनसुया, गार्गी, मैत्रेयी सारख्या विदुषी
होत्या तर एकीकडे त्यांची भोगवस्तू म्हणून कत्तल होत होती. हे मी अशा साठी सांगितले की त्या काळी ही स्त्री सुखी नव्हती. गुरूपत्नीलाही खूप राबावे लागत असे. त्यातून
हे ऋषी कोपिष्ट होते. ते केव्हा कुणाला शाप
देतील सांगता येत नसे.रामायण व महाभारत कालातील स्त्रिया आपण आजही वाचतो आहोत. सीतेला व द्रौपदीलाही काडीचे सुख
मिळाले नाही. द्रौपदीची इच्छे विरूद्ध वाटणी
झाली तर सीतेला नको त्या अग्निदिव्याला
सामोरे जावे लागले.कुंती माद्री गांधारी सत्यवती
अंबा अंबिका अंबालिका… सांगा ना कुठल्या स्त्रीला सुख मिळाले? मनाविरूद्धच लग्ने झाली.
उर्मिला, मांडवी, श्रूतकिर्ती सांगा ना कुणाला सुख मिळाले? स्त्रिया म्हणजे भोगवस्तू नि त्याग मूर्तीच फक्त बस्स.. बाकी काही नाही. तिने फक्त त्याग करायचा. दोन वेळेला खायला मिळते ना बस्स झाले.
स्त्री ना तेव्हा सुखी होती ना आता. तिच्या भोवती
सतत कुंपणे घातली गेली.१७ व्या १८ व्या शतकात तर तिची स्थिती भयावह होती. नऊ वर्षांच्या आत लग्न. १२ व्या वर्षी विधवा की लगेच केशवपन. अंधारात बसा. उभे आयुष्य तसे
काढा. वर घरातल्यांच्याच वासनेचे शिकार होत मानहानी स्वीकारायची. तोंड दाबून बुक्याचा मार. कुठेच सुख नाही अशी स्त्रीची अवस्था होती.पुरूष प्रधान समाज व्यवस्थेने चिरडले
होतेच वरून स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू होत्या.
ह ना आपटे यांनी “ पण लक्षात कोण घेतो”
या पुस्तकात स्त्रियांच्या हालअपेष्टांचे इत्यंभूत
वर्णन केले आहे. वाचवत नाही आपल्याला.
घराघरातून स्त्रियांचाच शिक्षणाला प्रचंड विरोध होता. रमा बाई रानडे यांच्या हातात न्यायमूर्ती
रानडे यांनी पाटी देताच घरातल्या निरक्षर स्त्रियांनी त्यांना प्रचंड छळले.स्वयंपाक घरात
प्रवेश वर्ज्य. मागच्या दारी विहिरीवरून पाणी
काढून डोक्यावरून अंघोळ करायची तेव्हा घरात
प्रवेश मिळे. शिक्षणा अभावी बायका वेड्यासारखे वागत होत्या. पुरुषांनी पुढाकार
घेऊन सुधारणा केली नाहीच वरून गैरफायदाच
घेतला. अशी स्थिती टिळक आगरकरांच्या काळात होती हो.. बोला!
आणि आता म्हणे सुधारणेची लाट आली आहे
म्हणे? किती बायकांना बाहेर जाऊ का हो?
विचारावे लागत नाही?आम्हाला सुधारणा फक्त
दुसऱ्याच्या घरात चालते. हो.. आम्ही खानदानी हो…दुसऱ्याची मुलगी बायको नाचलेली चालते.
आमची मुलगी बायको मात्र दाराबाहेर पडता कामा नये. कसले स्वातंत्र्य नि काय? नसत्या
वल्गना आहेत. किती पुरूष बरोबरीने स्वयंपाक
करू लागतात? ही बंधने ना स्त्रियांनी झुगारली
ना पुरूषांनी ती झुगारू दिली. चोविसतास बिनपगारी नोकराणी कुठे मिळणार आहे अशी.
स्त्रियाही या परिस्थितीला बहुतांशी जबाबदार
आहेतच. त्यागमुर्ती बनण्याची फार हौस ना?
मग भोगा आता पुढच्या कितीतरी पिढ्या.जो
पर्यंत मुलांना बरोबरीने मुली सारखी शिकवण
व कामाला लावले जात नाही तोवर ते ही पुरुषत्व गाजवणारंच ना? स्त्रियांनीच हा बंदिवास तोडला पाहिजे त्या शिवाय त्याचा
नायनाट होणे अवघड आहे मंडळी.आपणच
घरात मुलगा मुलगी भेद करून वेगवेगळी वागणूक त्यांना देतो. आपणच दोषी आहोत,
इतरांना दोष देऊन काय फायदा.एखादी स्त्री
स्वतंत्र राहू लागताच महिलांच्या कुटाळक्या
सुरू होतात.आम्ही महिला कायम बंदिवासातच
राहू कारण तेच आम्हाला आवडते, असेच मी
तरी म्हणेन अशीच परिस्थिती आहे यात वाद नाही.उगीच बंदी बंदी ओरडण्याचे कारण नाही.
कारण हा बंदिवासच आम्हाला फार गोड वाटतो.
बरंय् मंडळी…
ही फक्त माझी मते आहेत. ती कुणी मान्य करावी ही अपेक्षाच नाही.
धन्यवाद…
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)