हळबे महाविद्यालयात “खाद्य महोत्सव” उत्साहात साजरा
दोडामार्ग
दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत आयोजित खाद्य महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या विभागाच्या अन्न पूर्णा योजने अंतर्गत हा उपक्रम राबविला गेला. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक, विक्री आणि व्यवस्थापन कौशल्ये तसेच नेतृत्व गुण विकसित आणि वृद्धिंगत व्हावेत या प्रमुख उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवाचे उद्घाटन आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे जिल्हा क्षेत्र समन्वयक प्रा. उमेश परब यांचे हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, विभागाचे विस्तार कार्य शिक्षक डॉ. सोपान जाधव, प्रा. भाग्यश्री गवस, हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रा. रोहन बागकर व इतर प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा महोत्सव तृतीय वर्ष कला, वाणिज्य व हॉस्पिॅलिटी स्टडीज च्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला. महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या बिर्याणी, चिकन पुरी, छोले पुरी, गुलाब जामुन, गोबी मंच्युरियन, चिकन पकोडे इ. पदार्थांची मेजवानी उपस्थितांना घेता आली. तत्पूर्वी आयोजित द्वितीय सत्र प्रशिक्षण कार्यक्रमात प्रा. परब यांनी विद्यार्थ्यांना विस्तार विभागाचे कार्य, विविध प्रकल्पासंदर्भात माहिती आणि मुंबई विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या उडान महोत्सवासंदर्भात माहिती दिली.