मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभागातील ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२५’ आणि ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अशा उपक्रमातून महाविद्यालयात विविध व्याख्याने व स्पर्धांचे आयोजन मराठी विभाग आणि जी ओ शाह ग्रंथालयाने आयोजित केले आहे. जास्तीतजास्त विद्यार्थिंनी यात सहभागी व्हावे असे आव्हान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी केले व मराठी विभागास शुभेच्छा दिल्या.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘आत्मकथनातील ‘मी’चा प्रवास’ या विषयावर श्री एम. पी. शाह कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, मराठी विभागातील प्रा. प्रदीप पाटील यांनी विद्यार्थिंनीना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी ते म्हणाले की, ‘कुठलीही महान व्यक्ती वाचनामुळेच महान बनू शकते हे त्यांच्या आत्मचरित्राचा अभ्यास केल्यानंतरच समजते. ज्याला वाचनाची आवड आहे त्याला कुठेही कोणत्याही वेळी कंटाळा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कितीही लांबचा प्रवास असो. हातातील पुस्तक त्या प्रवासाचा कंटाळा आणून देत नाही. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जयप्रकाश नारायण अशा थोर व्यक्तींना आपल्या जीवनातील बराच काळ तुरुंगात काढावा लागला. तेथे वाचन या छंदाने त्यांना उत्तम साथ दिली. आपले संस्कार आणि जडणघडण कशी आहे हे वाचनातूनच आपल्याला कळते. आयुष्यातील वेगवेगळ्या दिशांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य वाचनातून प्राप्त होते. चरित्र व आत्मचरित्र यातील फरक व आत्मचरित्र व आत्मकथन यातील फरक त्यांनी विद्यार्थिंनींना समजावून सांगितला. ‘मी’ चा प्रवास हा मराठी आत्मकथनातून अधिक जवळून कळतो. तसेच आत्मकथनात ‘मी’ बरोबर त्याच्या समाजाचे चित्रण कसे केले जाते याचेही त्यांनी अनेक आत्मकथनांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. यावेळी आवर्जून ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’, लक्ष्मीबाई टिळक यांचे ‘स्मृतीचित्रे’, दया पवार यांचे ‘बलुतं’, सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ अशा अनेक आत्मचरित्रांचा त्यांनी आढावा घेतला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले. ह्या व्याख्यानास महाविद्यालयातील मान्यवर प्राध्यापक व विद्यार्थिंनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.