*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*
*माझ्या मनातली मैत्री*
मैत्री…मित्र… मैत्रिणी… हे शब्द किती जिव्हाळ्याचे वाटतात न!नाती निवडता येत नाही. पण मित्र मैत्रिणी आपण निवडू शकतो.
आपल्या मनातील भाव भावना न बोलताही समजतात ती मैत्रीण नी तीच मैत्री! मैत्रीमध्ये मनं. . स्वभाव आवडी निवडी. जुळायला हवेत. मैत्री होण्यासाठी हा समान धागा सुरवातीला तरी आवश्यक असतो त्यानंतर येतो विश्वास! सांगू की नको अशी शंका मनात आली की ती मैत्री कोरडी होते. हे एकदा जमलं की ती मै त्री नी मैत्रीण जिव्हाळ्याची होते. ,घट्ट होते.
बालपणीच्या, शाळेतल्या सख्यांची मैत्री निरागस असते. रूसवेफुगवे होतात पण बोटाला बोटं जोडून बट्टी करण्याची घाई ही होते. तशी निरागसता पुढे टिकेलच सांगता येत नाही. याला कारणही आहे मार्ग बदलतात.. कुणाची बदली होते. नी आपणही वयाने वाढलो की आपल्याही विचारांत बदल होतातच नं! संपर्क रहात नाही नी मैत्रीला पूर्णविराम मिळतो
पण अशी कोमल… निरागस…सुंदर मैत्री करायला.. जपायला कोणाला आवडणार नाही.?
कॉलेजजीवनातील मैत्री सुंदर स्वप्नांनी गुंफलेली असते..सोनेरी पंख ल्यायलेली असते.. आकाशांत झेप घेण्याच्या तयारीत असता एखादी सुरेख सुंदर मैत्री आयुष्यांत मिळाली तर सोनेपे सुहागा! आयुष्याच्या नी करीयरच्या दृष्टीने ती टर्निंग पॉइंट ठरते. अशी मैत्री आयुष्याला सुंदर वळण देते. काही करून दाखविण्यासाठी प्रोत्साहन देते. माझ्या मनांत या दोन्ही प्रकारच्या मैत्रीला स्थान आहे.
स्त्रीच्या जीवनात लग्न झाले की निश्चितच एक वेगळे वळण येते. तिचा नवरा तिचा मित्र झाला तर मग काय विचारायचे.! तिच्या भावना आणून घेणारा..तिला सर्व प्रसंगी साथ देणारा.सुख दु:ख.जाणणारा तिचा जीवाभावाच्या मित्रच होतो तो! नी अशी मैत्री काय वर्णावी! मनातील गुजगोष्टी .. हृदयांतलं समथिंग समथिंग .. नी एकंदरीत सर्वच भाव.. बोल ऐकू येणारा तो मित्र नी ती अतूट मैत्री कोणत्याही स्त्रीला नक्कीच आवडेल . माझ्या मनातला हा मित्र ..नी मैत्री सुदैवानं मला मिळालीय हं!
लग्न झालं की ,जिथे राहू तिथेही मैत्रिणी मिळतातच की! काही ख-या काही दिखाव्याच्या..काही औपचारीक मैत्रीपुरत्या! मनं जुळली.. विश्वास वाढला की मग सुख दुःखाच्या गोष्टी बोलायला.. आनंद शेअर करायला… हक्काने मदतीचा हात मागणारी नी देणारी,एखादी मैत्रीण मिळतेच. नी मैत्रिण कम् बहीण होते. जिच्या खांद्यावर मान ठेवून मनांतील बोलू शकतो…
मन मोकळं करून शकतो.. गळ्यात पडून रडू शकतो. मनावरचं ओझं हलकं करू शकतो. नी याही बाबतीत मी लकीच म्हणायला हवी . नागपुरात अशी मैत्रिण मला लाभलीय. एक्कावन्न वर्षे झालीत आमची मैत्री.. मैत्रीच्या सुगंधाने दरवळतेय ..वयानुसार परिपक्व..प्रगल्भ
झाली आहे. सगळ्यांना आम्ही बालपणीच्या मैत्रीणी वाटतो. लग्नानंतर मैत्री जुळलीय हे खरेच वाटत नाही.
मला निसर्गाशी ही मैत्री करायला आवडते. सूर्योदय सूर्यास्ताचे मनभावन रंग…आकाशातील मनास भासणा-या विवीध आकृत्या… फळांनी लगडलेले वृक्ष… विवीध रंगांनी सुगंधानी दरवळणारी. फुले… मनमोहक रानफुले.. खळाळणारे प्रपात…
हिरवाईने सजलेले शेतशिवारे..डोंगरमाथे…मनास लुभावतातपण आपल्याशी बोलतातही आपण सजग पाहिजे.
फुलांना नुसते कुरवाळा किती छान वाटते न! छोट्या जीवनातही आनंद देऊन जातात….. फळंझाडं सहनशीलता..संयम..दानवृत्ती शिकवतात. आकाशातील लोभस रंग आनंद देतात.. सौंदर्य दृष्टी देतात.. खळाळणा-या नद्या ओढे जीवनाचा प्रवाह निरंतर चालू रहाण्याचा संदेश देतात. या सर्वांशी मैत्री केल्याने. एक वेगळाच दृष्टीकोन शिकवण मिळते आपल्याला! आपलं जीवन समृद्ध करते ही मैत्री!
आपली आपल्याशीच ..आपल्या मनाशी मैत्री तर सर्वात बेस्ट! आपल्यातलं चांगलं ..वाईट. आपल्याला जाणवून देते. ..चुका दर्शविते.. चांगलं वागण्या बोलण्याची नव्याने संधी मिळवून देते. .काही चांगलं केलं की शाबासकी देते. प्रसंगी फटकारतेही! आपल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी प्रोत्साहनही देते. तू हे करू शकतेस असा आत्मविश्वासही देते. जीवन विकास साठी ही मैत्री म्हणजे अनमोल ठेवा आहे हो! तो नित्य जपायला हवाच.अशी स्वतः ची स्वतःशी मैत्री लयं भारी न!
सौ. मंजिरी अनसिंगकर नागपूर.