You are currently viewing स्व.आमदार बाबासाहेब सोमवंशीः शिक्षकामुख माणूस

स्व.आमदार बाबासाहेब सोमवंशीः शिक्षकामुख माणूस

 

16 जानेवारी ही माजी शिक्षक आमदार स्व. बाबासाहेब सोमवंशी यांची पुण्यतिथीची तारीख. विधान परिषद सदस्य आमदार प्रा.बी.टी. देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी शिक्षकांसाठी तसेच इतरांसाठी खऱ्या अर्थाने काम केले त्या स्व.बाबासाहेब सोमवंशी यांचा माझा परिचय अमरावतीच्या भारतीय महाविद्यालयातून झाला. खरं म्हणजे त्याकाळी भारतीय महाविद्यालय खूप चर्चेत होते. याचे कारण त्या महाविद्यालयामध्ये सर्वांनाच प्रवेश मिळत होता. सबके लिये खुला है मंदिर हमारा या न्यायाने तिथली संचालक मंडळी वागत होती. या महाविद्यालयाने अनेक शिक्षक अनेक प्राध्यापक अनेक विद्यार्थी घडविले आहेत. मा. स्व. बाबासाहेब सोमवंशी प्राचार्य अण्णासाहेब वैद्य माजी आमदार बबनराव मेटकर प्राचार्य बाळासाहेब कुलकर्णी प्राचार्य श्रीधर चिंचमलातपुरे प्राचार्य राजा महाजन प्राचार्य बबनराव कुलकर्णी प्राचार्य रामराव बिजवे प्राचार्य शाह वसंतराव भागवतकर ही सर्व जीवाभावाची मंडळी पुरोगामी विचारसरणीची मित्रमंडळी एकत्र आली व भारतीय विद्या मंदिराची स्थापना झाली. पुरोगामी चळवळीत असल्यामुळे या सर्वांचा माझा परिचय होता. विशेष म्हणजे प्राचार्य बाळासाहेब कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आम्ही काही सामाजिक चळवळी चालविल्या होत्या .बाबासाहेब सोमवंशी जेव्हा निवडणुकीला उभे राहिले तेव्हाचा काळ हा वेगळा होता. वर्तमानपत्र फक्त बातम्यांवर चालत होते .जाहिरातींची अपेक्षा नव्हती. मी तेव्हा धामणगाव रेल्वे येथील सुप्रसिद्ध आदर्श महाविद्यालयामध्ये मराठीचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो .प्राचार्य अण्णासाहेबांपासून तर बाबासाहेब सोमवंशी पर्यंत सर्वांनी मला बाबासाहेबांच्या निवडणुकीचं प्रचार प्रमुख केले. धामणगावचे कॉलेज सांभाळणे. अमरावतीला येणे. दिवसभराच्या प्रचार सभांचा आढावा घेणे. बातम्या तयार करणे. वर्तमानपत्रांना देणे ही सगळी जबाबदारी माझी होती. हे सगळं करायला रात्रीचे बारा वाजायचे. मी तेव्हा तपोवन येथील विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री संत अच्युत महाराज यांच्या निवासस्थानाच्या बाजूला राहत होतो. माझी पत्नी विद्या त्या ठिकाणी अध्यापिका म्हणून कार्यरत होती. भारतीय महाविद्यालय ते तपोवन हे साधारण सहा ते आठ किलोमीटरचे अंतर होते. मज जवळ तेव्हा फक्त सायकलच होती .पण ते काम मी आनंदाने केले. कुठलाही स्वार्थ नव्हता. एका चांगल्या विचारसरणीच्या चांगल्या मित्रांच्या बरोबर काम करीत होतो. त्याचा आनंद होता. निवडणूक झाली. निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर होत असताना अडचणी आल्या. मध्यरात्री उलटून गेली होती .पण प्रा. बी टी देशमुख यांनी त्या अडचणीवर मात केली आणि स्व. बाबासाहेब सोमवंशी हे केवळ 36 मतांनी निवडून आले. बाबासाहेब जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आले तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. मला पाच वाजता ते म्हणाले काठोळे तुमच्यामुळे मी निवडून आलो. मला नवल वाटले .पण ते म्हणाले तुम्ही प्रसिद्धीची बाजू फारच उत्कृष्ट सांभाळली. 36 मधील मधले 18 मते इकडे तिकडे झाली असती तर निकाल पालटला असता आणि लगेच बाबा साहेब म्हणाले बाळासाहेब कुलकर्णीच्या मिसेस दोन वर्षानंतर सेवानिवृत्त होत आहेत. आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला दोन वर्षानंतर प्राध्यापक म्हणून यावयाचे आहे .आम्ही पहाटे पहाटे कलेक्टर ऑफिस पासून भारतीय विद्यालयापर्यंत बाबासाहेबांची पायी मिरवणूक काढली. तेव्हा चार चाकी गाड्या तर दूर टू व्हिलर गाड्या देखील दुर्मिळ होत्या. बाबासाहेब आमदार झाल्यामुळे कामाचा आवाका वाढला. बाबासाहेबांनी त्यांचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे मुखपत्र असलेल्या विमाशि वार्तापत्राची जबाबदारी माझ्यावर दिली. नुटा बुलेटीनचे काम काही प्रमाणात मी करीत असल्यामुळे व तत्कालीन दैनिक अमरावती समाचारमध्ये पत्रकार म्हणून काम करीत असल्यामुळे मला संपादनाचा अनुभव होता .शिवाय माझ्या पाठीशी प्राचार्य डॉ भाऊ मांडवकर प्रा. मधुकर केचे शरदचंद्र सिन्हा बाबा मोहोड सुदाम सावरकर ही सगळी साहित्यिक मंडळी होती. तेव्हाचा काळ म्हणजे आताच्या सारखे संगणक तेव्हा आलेले नव्हते. मॅटर हातानेच लिहिल्या जात होते. प्रिंटिंग प्रेस मध्ये अक्षरांचे खिळे होते. त्याने अक्षर जुळवणी व्हायची. हे सगळे करणे म्हणजे तारेवरची कसरत होती. मी तेव्हा हे काम नियमितपणे केले. दोन वर्षानंतर भारतीय महाविद्यालयाची जाहिरात आली. मी रितसर अर्ज केला. खूप अर्ज आले .संस्थाचालकावर दबाव आला .काही उमेदवारांचे व त्यांच्या हितचिंतकांचे म्हणणे पडले की काठोळे धामणगावच्या आदर्श महाविद्यालयासारख्या चांगल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत . आमचा उमेदवार खाली आहे. पण प्राचार्य अण्णासाहेब वैद्य प्राचार्य बाळासाहेब कुलकर्णी बबनराव मेटकर व बाबासाहेब सोमवंशी आपल्या शब्दावर कायम राहिले. ते म्हणाले आम्ही काठोळेना शब्द दिलेला आणि त्याप्रमाणे झाले .मी भारतीय महाविद्यालयात रुजू झालो. अमरावतीला आल्यामुळे बाबासाहेबांकडे जाणे येणे वाढले. त्यांच्या अर्धांगिनी सौ इंदुमतीताई सोमवंशी यांना साहित्याची आवड. त्यामुळे त्या आमच्या साहित्य संगम परिवारात सहभागी झाल्या. बाबासाहेबांचे चिरंजीव व कन्या अनंत अनघा अश्विनी तेव्हा शाळेत शिकत होत्या. या परिवारामध्ये मी एक घटक केव्हा झालो ते मला कळलेच नाही. मी जेव्हा बाबासाहेबांचा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येते की या माणसाने खऱ्या अर्थाने घरादारावर पाणी सोडलेले होते .एक आमदार माणूस सतत लोकांसाठी काम करीत होता. दळणवळणाचे साधने नव्हते .चार चाकी तर सोडा दुचाकी देखील नव्हती .अनेक वेळा बाबासाहेब माझ्या लुनावर प्रवास करायचे .मला संकोचल्यासारखे वाटायचे. पण त्यांनी कधी संकोच बाळगला नाही. शिक्षकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. मित्रवर्य प्रा. बीटी देशमुख यांची समर्थ साथ मिळाल्यामुळे व बीटी देशमुख यांचा विधानभवनातील अनुभव दांडगा असल्यामुळे तो नकळतच बाबासाहेबांच्या कामी आला व त्यामुळे बाबासाहेबांच्या कार्य करण्याच्या पद्धतीला वेग आला .मला तो दिवस आठवतो.खरं म्हणजे तो दुःखाचा दिवस .पण तो सर्वांच्या दीर्घकाळ लक्षात राहील. परतवाड्याच्या भगवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये बाबासाहेबांचे भाषण सुरू होते. भाषण सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. काही कळण्याच्या आत त्यांची प्राणजोत मावळली.. इतरांना कळलेच नाही. दवाखान्यात भरती करण्यात आले. लोकांना वाटले. बाबासाहेब चांगले होतील. डॉक्टरांचे इलाज यशस्वी होतील. परंतु भाषण देत असतानाच बाबासाहेबांनी आपले प्राण सोडले होते. एक सच्चा व जिंदादिल माणूस आम्हाला कायमचा सोडून गेला होता. आज बाबासाहेब आमच्यात नाहीत.पण त्यांनी मित्र म्हणून शिक्षक म्हणून शिक्षक आमदार म्हणून जे काम केले व अनेकांचे प्रश्न सोडवले .अनेकांना न्याय मिळवून दिला .अनेकांना आयुष्यात उभे केले .ते कधीही विसरता येण्यासारखे नाही.

 

प्रा डॉ.नरेशचंद्र काठोळे

माजी प्राध्यापक भारतीय महाविद्यालय

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा